महिलांमध्ये थायरॉईड कर्करोगाचा धोका तिप्पट का?, जाणून घ्या-लक्षणे, कारणे व निदान कसे करायचे?
Thyroid cancer in women : कर्करोग हा शब्द ऐकताच मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, परंतु सर्वच कर्करोग जीवघेणे नसतात. थायरॉईड कर्करोग हा त्यापैकीच एक, जो लवकर आढळल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, जागतिक आकडेवारीनुसार एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे-पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण जवळपास तीन पट जास्त आहे.
विशेषतः 40 ते 50 वयोगटातील महिलांना याचा धोका अधिक असतो, तर पुरुषांमध्ये हा आजार वयाच्या 10 ते 20 वर्षांनंतर दिसून येतो. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त का आहे आणि यापासून बचाव कसा करावा, यावर तज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती.

महिलांना अधिक धोका का असतो?
तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरातील गुंतागुंतीची शरीररचना आणि संप्रेरके याला कारणीभूत आहेत...!
इस्ट्रोजेनचा प्रभाव: महिलांच्या शरीरातील 'इस्ट्रोजेन' हे संप्रेरक थायरॉईड पेशींच्या वाढीवर थेट परिणाम करते. यामुळे पेशींमध्ये असामान्य बदल होण्याचा धोका वाढतो.
हार्मोनल बदल : पौगंडावस्था (Puberty), गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती (Menopause) यांसारख्या टप्प्यांवर महिलांच्या शरीरात मोठे हार्मोनल बदल होतात. हे बदल थायरॉईड ग्रंथीला अधिक संवेदनशील बनवतात.
ऑटोइम्यून आजार : महिलांमध्ये 'हाशिमोटो' सारख्या ऑटोइम्यून थायरॉईड समस्या अधिक आढळतात. थायरॉईड ग्रंथीमध्ये दीर्घकाळ असलेली सूज किंवा जळजळ भविष्यात कर्करोगाचे रूप घेऊ शकते.
महत्त्वाची टीप : पुरुषांमध्ये थायरॉईड कर्करोग कमी आढळतो, परंतु तो अधिक आक्रमक असू शकतो. पुरुषांमध्ये याचे निदान उशिरा होत असल्याने तो अधिक गंभीर स्वरूप धारण करतो.
हे ही वाचा : भारतात 'या' कॅन्सरच्या महिला ठरत आहेत बळी, आजार होऊ नये म्हणून खबरदारी अन् काय काळजी घ्यावी वाचा
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
थायरॉईड कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अत्यंत सौम्य असतात, त्यामुळे अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मानेवर गाठ: मानेच्या पुढच्या भागात वेदनारहित गाठ किंवा सूज येणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे.
- आवाजात बदल : कोणत्याही कारणाशिवाय आवाजात सतत घोगरेपणा किंवा कर्कशपणा जाणवणे.
- गिळण्यास त्रास : अन्न किंवा पाणी पिताना घशात अडकल्यासारखे वाटणे.
- सतत खोकला : सर्दी किंवा संसर्ग नसतानाही बरा न होणारा खोकला.
- लिम्फ नोड्स : मानेच्या बाजूला असलेल्या लिम्फ नोड्सना सूज येणे.
हे ही वाचा : कोणताही आजार नाही, तरीही सतत थकवा जाणवतोय? शरीरात 'या' गोष्टींची असू शकते कमतरता!
उपचार आणि सकारात्मक निकाल
थायरॉईड कर्करोगाच्या उपचारांचे परिणाम अत्यंत सकारात्मक आहेत. ही एक जमेची बाजू मानली जातेय.
शस्त्रक्रिया : रोगाच्या तीव्रतेनुसार थायरॉईड ग्रंथीचा काही भाग (Lobectomy) किंवा संपूर्ण ग्रंथी (Thyroidectomy) काढून टाकली जाते.
रेडिओएक्टिव्ह आयोडीन थेरपी : शस्त्रक्रियेनंतर शरीरात उरलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो.
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी : थायरॉईड ग्रंथी काढल्यानंतर शरीरातील चयापचय क्रिया चालू ठेवण्यासाठी रुग्णांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. यामुळे कर्करोग पुन्हा उद्भवण्याचा धोकाही कमी होतो.
प्रतिबंधासाठी काय करावे?
थायरॉईड कर्करोग पूर्णपणे रोखणे कठीण असले तरी, काही खबरदारी घेऊन धोका कमी करता येतो.
रेडिएशन टाळा: विशेषतः लहानपणी मानेच्या भागात अनावश्यक रेडिएशन एक्सपोजर टाळावे.
आयोडीनयुक्त आहार : आहारात आयोडीनचे योग्य प्रमाण ठेवा.
नियमित तपासणी : ज्यांना थायरॉईडच्या गाठी किंवा कुटुंबात थायरॉईड आजाराचा इतिहास आहे, त्यांनी नियमित हेल्थ चेकअप करावे.












Click it and Unblock the Notifications