भारतात 'या' कॅन्सरच्या महिला ठरत आहेत बळी, आजार होऊ नये म्हणून खबरदारी अन् काय काळजी घ्यावी वाचा
Cervical cancer awareness symptoms causes hpv vaccine guide : जानेवारी महिना जगभरात 'सर्वाइकल कॅन्सर जागरूकता महिना' म्हणून पाळला जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्चच्या एका धक्कादायक अहवालानुसार, भारतात दर ८ मिनिटांना एका महिलेचा मृत्यू सर्वाइकल कॅन्सरमुळे होतो. गर्भाशयाच्या मुखाचा हा कर्करोग महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत असला, तरी वेळेवर तपासणी आणि लसीकरण केल्यास तो १००% टाळता येण्याजोगा आहे.

काय आहे सर्वाइकल कॅन्सर?
हा कर्करोग गर्भाशयाच्या खालच्या भागात (सर्व्हिक्स) होतो. याचे मुख्य कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा विषाणू आहे. हा विषाणू प्रामुख्याने लैंगिक संबंधांतून पसरतो. अनेकदा हा विषाणू शरीरात बराच काळ सुप्त अवस्थेत राहतो आणि नंतर कर्करोगाचे रूप धारण करतो.
सुरुवातीची लक्षणे
या आजाराला 'सायलेंट किलर' म्हटले जाते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. तरीही खालील बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
- मासिक पाळी संपल्यानंतर किंवा दोन पाळीच्या मध्ये रक्तस्त्राव होणे.
- शरीरसंबंधांनंतर वेदना किंवा रक्तस्त्राव होणे.
- योनीमार्गातून पांढरा, दुर्गंधीयुक्त किंवा रक्तमिश्रित स्त्राव येणे.
- कंबर किंवा ओटीपोटात सतत वेदना जाणवणे.
- अचानक वजन कमी होणे आणि प्रचंड थकवा जाणवणे.
आजार रोखण्याचा सोपा मार्ग काय?
लक्षणे दिसण्यापूर्वीच या आजाराचे निदान करणे शक्य आहे. त्यासाठी तज्ज्ञ दोन मुख्य चाचण्या सुचवतात.
१. पॅप स्मीअर टेस्ट (Pap Smear): ही अत्यंत सोपी चाचणी असून यात गर्भाशयाच्या मुखातील पेशींचे नमुने घेतले जातात. २१ वर्षांनंतर प्रत्येक ३ वर्षांनी ही चाचणी करणे सुरक्षित मानले जाते.
२. HPV टेस्ट: ३० वर्षांनंतर दर ५ वर्षांनी ही चाचणी केल्यास विषाणूच्या संसर्गाचा धोका आधीच ओळखता येतो.
HPV लस: एक वरदान
सर्वाइकल कॅन्सर रोखण्यासाठी HPV लस अत्यंत प्रभावी आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देणे सर्वाधिक फायदेशीर ठरते (२ डोस). मात्र, १५ ते ४५ वयोगटातील महिला देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस घेऊ शकतात (३ डोस).
(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)












Click it and Unblock the Notifications