महिला वर्ल्ड कपमध्ये 'महाउलटफेर'! ऑस्ट्रेलिया-इंग्लंड बाहेर; भारत vs दक्षिण आफ्रिका फायनल कधी? वाचा
Women world cup final 2025 : महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये आज इतिहास घडला आहे! जेतेपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आणि लीग टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांचे फायनलचे स्वप्न चकनाचूर झाले आहे. भारतीय महिला संघाने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जेमिमा रोड्रिग्सच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर वर्ल्ड कपमधील सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीरित्या पार करत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. आता 'टेबल टॉपर' संघांना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी
गुरुवारी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमी येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाने अविश्वसनीय कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु, भारतीय फलंदाज जेमिमा रोड्रिग्स (नाबाद १२७ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (८९ धावा) यांच्या विस्फोटक आणि निर्णायक भागीमुळे भारताने हे मोठे लक्ष्य गाठले.
ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोरही ठरला कमी!
खास बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मोठा स्कोरही कमी ठरला! वर्ल्ड कप इतिहासात सर्वात मोठा स्कोर यशस्वीरित्या चेस करण्याचा विक्रम भारतीय महिला संघाने प्रस्थापित केला. भारताने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. २०१७ मध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये हरवले होते.
दक्षिण आफ्रिकेनेही घडवला इतिहास
पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी करत इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. विशेष म्हणजे, लीग टेबलमध्ये इंग्लंड पहिल्या, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर होता; मात्र या दोन्ही बलाढ्य संघांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे यंदा महिला विश्वचषकाला २५ वर्षांनंतर नवा विजेता मिळणार आहे, कारण ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या २५ वर्षांपासून चॅम्पियन होता.
फाइनल कधी आणि कुठे होणार?
आता महिला विश्वचषकाचा अंतिम आणि अत्यंत रोमांचक सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. सेमीफायनलप्रमाणेच हा अंतिम मुकाबला देखील मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमी येथेच होणार आहे. दुपारी तीन वाजता हा सामना खेळला जाणार आहे.
हेही वाचा : Indw Vs Ausw: ऑस्ट्रेलियाचा पराभव का झाला? वाचा 3 कारणं, अन् भारतीय महिला संघाच्या विजयाचे विश्लेषण
हेही वाचा : IND vs AUS T20:भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला T-20 रद्द झाल्यानंतरही टीम इंडियाला 2 मोठे फायदे!












Click it and Unblock the Notifications