भारतीय संघासोबत इंग्लंडला गेला, आता खेळणार यॉर्कशायरकडून, कोण आहे हा मराठमोळा क्रिकेटपटू?
भारतीय क्रिकेटमधील एक आश्वासक नाव असलेला आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेला ऋतुराज गायकवाड आता इंग्लंडच्या मैदानांवर यॉर्कशायरकडून खेळताना दिसणार आहे. भारताच्या 'अ' संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या ऋतुराजने आता काउंटी क्रिकेटमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

यॉर्कशायरकडून डिव्हिजन वन आणि एकदिवसीय स्पर्धांमध्ये खेळणार
ऋतुराज गायकवाड यॉर्कशायर संघात जुलैपासून सहभागी होणार असून, तो पाच एकदिवसीय सामन्यांसह काउंटी चॅम्पियनशिपच्या काही लढतींसाठी मैदानात उतरणार आहे. सरेविरुद्ध होणाऱ्या सामन्याने त्याचा इंग्लंडमधील प्रवास सुरू होणार आहे. यॉर्कशायर संघाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती जाहीर केली आहे.
'अ' संघात संधी न मिळालेला ऋतुराज, यॉर्कशायरमध्ये मोठ्या भूमिकेत
सध्या ऋतुराज भारताच्या 'अ' संघाचा भाग असला तरी त्याला इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन चार दिवसांच्या सामन्यांमध्ये खेळवण्यात आले नव्हते. याआधीही त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 'अ' संघाचं नेतृत्व केलं होतं. यंदा मात्र तो बेंचवरच होता आणि कसोटी संघातही त्याला स्थान मिळालं नव्हतं. 13 ते 16 जून दरम्यान 'अ' संघाचा भारतीय सीनियर संघाविरुद्ध सामना होणार असून, तिथे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
ऋतुराजचा अनुभव आणि आकडेवारी ठळक
पुणेकर ऋतुराज गायकवाड याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आपली ओळख निर्माण केली आहे. आयपीएल 2025 मध्ये तो सीएसकेचा कर्णधारही होता, मात्र दुखापतीमुळे काही सामन्यांतून तो बाहेर होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने 6 एकदिवसीय सामन्यांत 115 धावा, तर 23 टी-20 सामन्यांमध्ये 633 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये त्याने शानदार शतक झळकावले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 38 सामन्यांत त्याच्या नावावर 2632 धावा असून त्याची सरासरी 41.77 इतकी आहे. लिस्ट ए सामन्यांत त्याचा परफॉर्मन्स अधिक प्रभावी असून 86 सामन्यांत 56.15 च्या सरासरीने 4324 धावा आणि 16 शतके त्याच्या खात्यात आहेत.
गायकवाड म्हणतो, यॉर्कशायरमध्ये खेळण्याचे स्वप्न होते
यॉर्कशायर क्लबने ऋतुराजविषयी माहिती देताना त्याला 'भारताचा टॉप-ऑर्डर फलंदाज' म्हणून गौरवले आहे. ते म्हणाले, "तो डावाची सुरुवात करू शकतो आणि टॉप फोरमध्ये कुठेही खेळू शकतो." स्वतः ऋतुराजनेदेखील आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं, "माझं नेहमीच स्वप्न होतं की इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळावं, आणि यॉर्कशायरसारख्या प्रतिष्ठित संघातून खेळण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे."
भारतीय संघात सध्या स्पर्धा प्रचंड असल्यामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना सतत संघाबाहेर बसावं लागतं. अशा परिस्थितीत यॉर्कशायरकडून ऋतुराजसारख्या फलंदाजाला मिळालेली संधी त्याच्यासाठी नव्या उंचीवर जाण्याचा मार्ग ठरू शकते. जर त्याने येथे सातत्य दाखवलं, तर त्याच्या नावाची पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात दावेदारी होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications