Ind vs pak : भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत; 22 फेब्रुवारीला पाकिस्तानशी सामन्याची शक्यता!
Ind vs Pak : क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत म्हणजे केवळ सामना नाही, तर तो असतो कोट्यवधी क्रीडाप्रेमींसाठी एक भावनिक 'युद्ध'! आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये पुरुष संघ सुपर-८ ची तयारी करत असताना, हाँगकाँगमध्ये मात्र महिलांच्या मैदानावर एक मोठा थरार रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'विमेन्स रायझिंग स्टार्स टी-२० आशिया चषक' (Women's Rising Stars T20 Asia Cup) स्पर्धेत भारतीय महिला 'अ' संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. आता सर्वांचे लक्ष २२ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले असून, तिथे भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट रसिकांचे डोळे आता टीव्ही स्क्रीनला खिळणार असून, चौके आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

कर्णधार राधा यादवची अष्टपैलू कामगिरी
या विजयाची खरी शिल्पकार ठरली ती म्हणजे कर्णधार राधा यादव. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका 'अ' संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र राधाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात लंकेच्या फलंदाजांना अडकवले. तिने अवघ्या १९ धावा देत ४ बळी टिपले. राधाच्या या भेदक माऱ्यामुळे १० षटकात ७१/२ अशी सुस्थितीत असलेली श्रीलंका ११८ धावांत गारद झाली. तिला तनुजा कंवर आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली.
वृंदा दिनेशची फटकेबाजी
११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने काही विकेट्स गमावल्या, मात्र सलामीवीर वृंदा दिनेशने ४२ धावांची आक्रमक खेळी करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर कर्णधार राधा यादवने फलंदाजीतही आपली चमक दाखवली. तिने केवळ १८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा कुटल्या आणि १३.३ षटकातच भारताला विजय मिळवून दिला.
रविवारची फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान?
भारत अंतिम फेरीत पोहोचला असून दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. जर पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत केले, तर रविवारी २२ फेब्रुवारीला चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय-व्होल्टेज अंतिम सामना पाहायला मिळेल.
हेही वाचा : सांगलीची कन्या ठरली 'क्वीन ऑफ क्रिकेट'; स्मृती मानधनाला 'BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार
हेही वाचा : चौथ्या वर्षी हाती बॅट वडील पहिले प्रशिक्षक, वर्ल्डकपमध्ये इतिहास घडताच धायमोकलून रडली जेमिमा -VIDEO












Click it and Unblock the Notifications