सांगलीची कन्या ठरली 'क्वीन ऑफ क्रिकेट'; स्मृती मानधनाला 'BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार
Smriti Mandhana News : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज आणि महाराष्ट्राची शान स्मृती मानधना हिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्मृतीची २०२५ सालच्या प्रतिष्ठित 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' (ISWOTY) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सोमवारी दिल्लीत पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

विश्वचषक विजयातील 'स्मृती'धायक कामगिरी
भारतीय महिला क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखे ठरले. यावर्षी भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयामध्ये स्मृती मानधनाने आपल्या बॅटने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे होते. तिच्या याच सातत्यपूर्ण आणि मॅच-विनिंग कामगिरीची दखल घेत परीक्षकांनी तिची या पुरस्कारासाठी निवड केली.
"भारतीय महिला क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष अतिशय खास राहिले. विश्वचषक विजयात मी योगदान देऊ शकले, याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे."
- स्मृती मानधना (व्हिडिओ संदेशाद्वारे)
ऑस्ट्रेलियातून मानले आभार
स्मृती सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. दौऱ्यावर असल्यामुळे ती दिल्लीतील सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही, मात्र तिने एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे बीबीसी आणि निवड समितीचे आभार मानले. विशेष म्हणजे, या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये लिएंडर पेस, दीपा मलिक आणि अंजू बॉबी जॉर्ज यांसारख्या दिग्गज क्रीडापटूंचा समावेश होता.
स्मृती मानधना: विक्रमांचे शिखर
२९ वर्षीय स्मृती मानधना आज जागतिक महिला क्रिकेटमधील एक 'ब्रँड' बनली आहे. सांगलीसारख्या छोट्या शहरातून प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणाऱ्या स्मृतीच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत:
वेगवान शतक: २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तिने अवघ्या ५० चेंडूत शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी खेळाडू ठरली.
सर्वाधिक शतके: महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर आहे.
धावांचा पाऊस: सर्वाधिक धावा करणाऱ्या जागतिक महिला क्रिकेटपटूंच्या यादीत स्मृती तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
बीबीसी पुरस्कार २०२५: अन्य मानकरी
या सोहळ्यात केवळ स्मृतीच नव्हे, तर इतरही प्रतिभावान खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्याच दिव्या देशमुखचाही समावेश आहे.
- पुरस्काराचे नाव : विजेत्याचे नाव : क्रीडा प्रकार
- बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर : दिव्या देशमुख : बुद्धिबळ (ग्रँडमास्टर)
- बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर : प्रीती पाल : पॅरा-अॅथलीट
- बीबीसी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड : अंजली भागवत : नेमबाजी












Click it and Unblock the Notifications