ICC रॅकिंगमध्ये पुन्हा बुमराहचाच बोलबाला;यशस्वी जैस्वाल अन् कोहली कितव्या स्थानावर, वाचा सविस्तर
आयसीसी रॅकिंग नुकतीच जाहीर झाली आहे. यात पुन्हा एकदा भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा ICC कसोटी क्रमवारीत टॉप स्थानी पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी नवीन रॅकिंग जाहीर केली. यात बुम..बुम...बुमराह अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
भारत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील पहिल्या कसोटीत बुमराहने आठ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहलाही सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत कमालीचा बदल झाला असून तो शिर्षस्थानी पोहोचला आहे.

साऊथ आफ्रिकेच्या रबाडाला टाकले मागे
आयसीसीच्या क्रमवारीनुसार, बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकले आणि या वर्षामध्ये दुसऱ्यांदा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत रबाडा आणि जोश हेझलवूड यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर होता. परंतु, या बुधवारी झालेल्य क्रमवारीत तो टॉप स्थानावर पोहोचला आहे.
श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणारा रबाडा कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच बळी घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या स्थानावर आहे.
यशस्वीनेही उडी घेतली
भारताच्या ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी विजय मिळवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या यशस्वी जैस्वालनेही क्रमवारीत झेप घेतली आहे. यशस्वीने फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या इंग्लंडचा जो रूट त्याच्या समोर आहे. यशस्वीचा रेटिंग पॉइंट 825 आहे जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे.
यशस्वीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली होती. मात्र, पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. यशस्वीने केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली होती.
कोहलीला किती क्रमाकांचा झाला फायदा
पर्थ कसोटीत नाबाद शतक झळकावणारा स्टार फलंदाज विराट कोहलीचाही नऊ स्थानांचा फायदा झाला असून तो 13व्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने नाबाद 100 धावा केल्या होत्या. हे त्याचे कसोटीतील 30 वे शतक ठरले. खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन 14 व्या स्थानावर घसरला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनाही दोन आणि चार स्थानांनी पराभव पत्करावा लागलेला आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजा टॉप..
रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत टॉप-2 मध्ये कायम आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोघेही संघाचा भाग नव्हते. बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन याने वेस्ट इंडिजविरुद्ध बॅट आणि बॉलने केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर तीन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.












Click it and Unblock the Notifications