हरमनप्रीत कौरने शतक झळकावून रचला इतिहास, मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी
हरमनप्रीत कौरने पूर्ण केल्या ४००० धावा: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पुन्हा फॉर्ममध्ये परतली आहे. २२ जुलै रोजी (मंगळवार) इंग्लंडविरुद्ध डरहम (Durham) येथील रिव्हरसाईड ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने शतक झळकावत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यादरम्यान तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासह, हा टप्पा गाठणारी ती भारताची तिसरी महिला खेळाडू बनली आहे.

खास क्लबमध्ये हरमनप्रीतची एन्ट्री
या खास क्लबमध्ये हरमनप्रीतपूर्वी केवळ मिताली राज (७८०५ धावा) आणि सध्याची उपकर्णधार स्मृती मानधना (४५८८ धावा) यांचा समावेश होता. आता हरमनप्रीत कौरनेही या एलिट यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. तिने हा पराक्रम तिच्या १४९ व्या एकदिवसीय सामन्यातील १२९ व्या डावात साधला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या.
असे आहे हरमनप्रीतचे करिअर
हरमनप्रीत कौरच्या करिअरची सुरुवात २००९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्याने झाली होती. तेव्हापासून तिने आतापर्यंत ३३७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, जे कोणत्याही भारतीय महिला खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील तिची सर्वोत्तम धावसंख्या १७१* धावा आहे, जी तिने २०१७ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. ही खेळी आजही महिला क्रिकेटमधील सर्वात अविस्मरणीय खेळींपैकी एक मानली जाते.
चाहते करत आहेत भरभरून कौतुक
हरमनप्रीतच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहते खूप आनंदी आहेत. सोशल मीडियावर तिला अभिनंदन करणाऱ्यांचा पूर आला आहे. भारताकडून महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू अजूनही मिताली राज आहे, जिने २११ डावांमध्ये ७८०५ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना १०५ डावांमध्ये ४५८८ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि आता हरमनप्रीत कौर १२९ डावांमध्ये ४००० धावांच्या आकड्यांसह तिसऱ्या स्थानावर आली आहे.












Click it and Unblock the Notifications