बुद्धिबळातील स्टार दिव्या देशमुख कोण आहे? वर्ल्ड नंबर-1 चिनी खेळाडूला हरवलं, मोदींनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली - भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने लंडनमध्ये पार पडलेल्या World Blitz Team बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या दिग्गज खेळाडू हाउ यिफान हिला पराभूत केलं आहे. हाउ यिफान या महिलांमधील जागतिक क्रमवारीत अव्वल (World Number 1) आहेत. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत यिफानने दिव्याचा पराभव केला होता. मात्र, 19 वर्षांची दिव्या हिने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करत विजय मिळवला.

सफेद मोहऱ्यांनी खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच यिफानवर दडपण निर्माण केलं. ब्लिट्झ बुद्धिबळात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वेळेचा उत्कृष्ट वापर करत तिने सामना आपल्या बाजूने खेचून आणला. दिव्याच्या या विजयाची देशभरात आणि बुद्धिबळ विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट
दिव्याच्या या अद्भुत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला X (पूर्वीचं ट्विटर) वरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिलं,
"World Team Blitz Championship, लंडनच्या सेमीफायनलमधील दुसऱ्या सामन्यात World Number 1 हाउ यिफानला पराभूत केल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. तिचं हे यश तिच्या धैर्याचं आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. हे यश भविष्यातील अनेक बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल. तिला आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा!"
Congratulations to Divya Deshmukh on defeating the World No. 1, Hou Yifan in the 2nd leg of Blitz semifinal at the World Team Blitz Championships, London. Her success highlights her grit and determination. It also inspires many upcoming chess players. Best wishes for her future… pic.twitter.com/mjdWO0llFT
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2025
केवळ 5व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात
दिव्या देशमुख हिचा जन्म 9 डिसेंबर 2005 रोजी नागपूर येथे झाला. तिचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख आणि आई डॉ. नम्रता देशमुख दोघंही डॉक्टर आहेत. अवघ्या 5व्या वर्षी दिव्याने बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली होती.
केवळ 7व्या वर्षी (2012) तिने Under-7 राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झालेल्या U-10 जागतिक युवक स्पर्धा आणि 2017 मध्ये ब्राझीलमध्ये पार पडलेल्या U-12 जागतिक युवक स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवलं.
वुमन ग्रँडमास्टर ते इंटरनॅशनल मास्टरपर्यंतचा प्रवास
दिव्याने लवकरच आपली गुणवत्ता सिद्ध करत Woman FIDE Master (WFM) ही पदवी मिळवली. ऑक्टोबर 2021 मध्ये तिने Woman Grandmaster (WGM) ही मानद पदवी मिळवली. ही कामगिरी करणारी विदर्भातील पहिली आणि भारताची 22वी महिला खेळाडू ठरली.
2023 मध्ये तिने International Master (IM) ही अत्यंत प्रतिष्ठित पदवीही आपल्या नावावर केली. तिचं नाव आज जागतिक कनिष्ठ क्रमवारीत नंबर 1 म्हणूनही घेतलं जातं. 2024 मध्ये झालेल्या World Junior Girls U-20 Championship मध्ये तिने 11 पैकी 10 गुण मिळवत विजेतेपद मिळवलं.
भारताला ऑलिंपियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं
दिव्याने केवळ वैयक्तिक स्पर्धांमध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघासाठीही मोठं योगदान दिलं आहे. 45व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती.
तिने World Team Rapid and Blitz Championship च्या Blitz विभागात 2600 पेक्षा जास्त परफॉर्मन्स रेटिंग मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
दिव्या देशमुख ही केवळ एक बुद्धिबळपटू नाही, तर भारताची बुद्धिबळ विश्वातली नवी आशा आहे. तिच्या खेळातील कौशल्य, मानसिक ताकद आणि सतत प्रगतीची जिद्द ही भावी पिढीतील खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. तिचं हे यश केवळ तिच्या कुटुंबाचा, नागपूरचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे.
त्यामुळेच पंतप्रधान मोदींसह संपूर्ण देश आज दिव्याच्या या विजयाचा जल्लोष करत आहे आणि उत्सुकतेने तिच्या पुढच्या मोसमाकडे पाहत आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications