विधानभवन परिसरात मध्यरात्री पुन्हा रा़डा, जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले; काय घडलं?
काल (१७ जुलै) रात्री उशिरा विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. रात्री २ वाजेपर्यंत आव्हाडांनी विधानभवन परिसरात चांगलाच गोंधळ घातला.

नेमकं काय घडलं?
विधानसभा अधिवेशनाचा आज (१८ जुलै) शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी, काल आव्हाड यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या धमक्यांबाबत माहिती दिली होती, ज्यात गोपीचंद पडळकर यांच्याशी झालेल्या वादानंतरच्या घटनांचा उल्लेख होता. यानंतर काही वेळातच विधानभवनाच्या लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, तो मारामारीत आणि शिवीगाळात बदलला.
या वादामध्ये गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकर यांच्या पाच कार्यकर्त्यांना सोडून दिले, मात्र मार खाणाऱ्या नितीन देशमुखला अटक करून घेऊन जात होते.
जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप आणि आंदोलन
पोलिसांनी नितीन देशमुखला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताच, आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवली आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आव्हाडांनी आरोप केला की, "मारहाण करणाऱ्यांना पोलीस पाठराखण करत आहेत आणि त्यांना वडापाव, तंबाखू मळून देत आहेत, तर मार खाणाऱ्याला अटक केली जात आहे."
यावेळी आवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आणि पोलिसांच्या कृतीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे तासभर चाललेल्या या गोंधळात पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः गाडीसमोरून फरफटत बाजूला केले. त्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवले आणि दुसऱ्या गाडीतून देशमुखला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आव्हाडांनी हे पाहिले आणि पुन्हा गोंधळ सुरू झाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील घटनास्थळी उपस्थित होते.
या घटनेमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे, तर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications