आव्हाडांच्या माणसाला नडणारा ऋषिकेश टकले कोण? राजकीय पार्श्वभूमी काय? आव्हाडांचे गंभीर आरोप...
विधानभवनाच्या परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या जोरदार राड्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हाणामारीमध्ये सहभागी असलेला एक कार्यकर्ता ऋषिकेश टकले असल्याचे समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील रहिवासी असलेला ऋषिकेश टकले हा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. तो अधिवेशनासाठी पडळकरांसोबत मुंबईत आला होता.

ऋषिकेश टकले हा 'हिंदुस्तान शिव मल्हार संघटना' या संघटनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष आहे. पलूस तालुक्यातील पाचवा मैल या ठिकाणी तो राहतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखा असतो आणि त्यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून वावरतो. विधानभवन परिसरात त्यानेच हा गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे विरोधकांनी तीव्र टीका केली आहे.
या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे की ऋषिकेश टकले हा 'मोका' (MCOCA) कायद्यांतर्गत आरोपी आहे. यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. विधानभवनात आमदारांनाच सुरक्षित वाटत नसल्याचा संदेश या घटनेमुळे राज्यात गेला आहे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऋषिकेश टकले आपला कार्यकर्ता असल्याचे कबूल केले आहे आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. या घटनेनंतर विधानभवनातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून अशा प्रकारची कृती झाल्याने सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications