नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांचा विजय; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकिर्द, महाराष्ट्राचा महानायक
Maharashtra Assembly Election 2024 : नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांचा पराभव करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खिशात टाकला.
गेल्या दहा वर्षात राज्यात राजकीय वर्तुळात सर्वाधिक प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. शिक्षणाने वकील आणि व्यवस्थापनाची पदवी असलेल्या फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नगरसेवक, सर्वात कमी वयाचा महापौर अशी पदे भूषवित 1999 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशीही ते संबंधित होते. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

1999 साली राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार गेले आणि युतीला विरोधी बाकांवर बसावे लागले. आमदारकीच्या पहिल्या वेळेपासूनच सभागृहातील अभ्यासू आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली ओळख निर्माण केली. सलग तीन निवडणुका त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. सभागृहातील त्यांच्या भाषणांची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. 2014 साली मुख्यमंत्री पदाची माळ अचानकपणे त्यांच्या गळ्यात घालण्यात आली.
धोरणी, मुत्सद्दी, मृदुभाषी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांनी राजकीय प्रवास केला. जनहिताच्या अनेक योजना आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी राबवल्या. पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प पूर्ण करून "इन्फ्रा मॅन" अशी ओळख त्यांनी निर्माण केली. शिवसेनेसारख्या बेभरवशी सहकार्याला सोबत घेऊन सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी टिकून राहण्याचा अलीकडच्या काळातला विक्रम त्यांच्या नावावर आहे. मराठा आरक्षण, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो अशा अनेक योजना त्यांनी महाराष्ट्राला दिल्या.
2019 साली मुख्यमंत्रीपदाच्या भरल्या ताटावरून त्यांना उठावे लागले. पण स्वतःवर आलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अत्यंत गांभीर्याने स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला सळोकी पळवून सोडले. एका निर्णायक क्षणी घाव घालून महाविकास आघाडी सरकार गडगडले आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने अडीच वर्षे समर्थपणे महायुतीचे सरकार चालवले. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्व पक्षीय आमदारात असलेली मैत्री आणि विश्वासार्हता तसेच कार्यक्षमता ही त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये आहेत. महाविकास आघाडीचा क्रमांक एकचा शत्रू म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे असंख्य प्रयत्न महाविकास आघाडीने केले परंतु देवेंद्र फडणवीस पुन्हा नव्या दमाने नवा डाव खेळण्यासाठी सिद्ध झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications