तासगावात रोहित पाटलांचाच जलवा; वडील आर. आर. आबांचा वारसा चालविणार
Tasgaon Assembly Election Result 2024- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघ जिंकून, पित्याचा वारसा राखला. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांचा 27 हजार मतांनी पराभव केला. रोहित पाटील यांना 1,28,403 मते मिळाली. तर त्यांचे विरोधी संजय पाटील यांना 1,00,759 मते मिळाली.

रोहित पाटलांनी राखला वडिलांचा वारसा
आर आर पाटील हे महाराष्ट्राचे राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. तासगाव तालुक्यातील अंजनी या छोट्याशा गावात आर आर पाटील यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. प्रभावी वक्तृत्वामुळे ते चर्चेत आले आणि शरद पवार यांची नजर त्यांच्यावर पडली. जिल्हा परिषद, विधानसभा, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असा खूप मोठा प्रवास त्यांनी केला. अंगभूत साधेपणा, विनम्र स्वभाव आणि सुसंस्कृत भाषाशैली आणि स्वच्छ कारकीर्द यामुळे आर आर पाटील हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. ग्रामीण विकास मंत्री म्हणून अनेक उपक्रम त्यांनी राबवले.
नगरपालिकेतही दाखवली होती चमक
2014 साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता गेली आणि त्यानंतर काही दिवसातच आर आर पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार कुटुंबीयांनी आर आर परिवाराला कधी अंतर दिले नाही. आर आर पाटील यांच्या पश्चात तासगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना शरद पवार यांनी संधी दिली. आणि त्यांनी दोन वेळा तासगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे वय कमी असल्यामुळे त्यांना त्यावेळी विधानसभेत संधी मिळाली नाही. पण किमान वयोमर्यादा गाठताच शरद पवार यांनी त्यांना संधी दिली. तासगाव नगरपालिकेच्या राजकारणात रोहित पाटील यांनी कमाल करून दाखवली होती. पित्या सारखीच वक्तृत्व शैली असलेल्या रोहित पाटील यांच्या राजकीय पदार्पण बद्दल महाराष्ट्राला उत्सुकता होती.
शरद पवारांना मिळाले आश्वासक नेतृत्व
रोहित पाटील यांना तासगाव मध्ये घेरण्यासाठी भाजपने माजी खासदार संजय काका पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू दिला. संजय काका पाटील हे सांगली जिल्ह्यातील तगड नेतृत्व आहे. स्वतः अजित पवार यांनी संजय काका पाटील यांचा जातिनिशी प्रचार केला. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात आर आर पाटील यांच्या बद्दल अजित पवार यांनी केलेले विधान संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिले गेले. पण अखेरीस आर आर पाटील यांनी संजय काका पाटील यांच्यावर मात केली. शरद पवार गटाचा संपूर्ण महाराष्ट्रात धुवा उडालेला असताना तासगाव मधून रोहित पाटील यांच्या रूपाने शरद पवार यांना एक नवे, तरुण आणि आश्वासक नेतृत्व मिळाले आहे. आता आर आर पाटील यांच्याप्रमाणे रोहित पाटील महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या ठसा उमटवतात का, याची उत्सुकता आहे.












Click it and Unblock the Notifications