सिंदखेडराजा मतदारसंघात शिवसेनेचे शशिकांत खेडेकर पुन्हा रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024 : ऐतिहासिक दृष्ट्या सिंदखेडराजा या ठिकाणाला खूप मोठे महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थान म्हणजे सिंदखेड राजा. सिंदखेड राजा हा बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ आहे. तर सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे वगैरे बघण्याजोग्या वास्तू आहेत.
सध्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाला प्रचंड महत्त्व आले असून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. शिवसेनेने शशिकांत खेडेकर या माजी आमदारांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीकडून माजी मंत्री आणि अनेक वेळा सिंदखेड राजा मधून निवडून गेलेले राजेंद्र शिंगणे या माजी मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. चित्र विचित्र घडामोडी घडत घडत या लढतीला अंतिम स्वरूप आलेले आहे.

राजेंद्र शिंगणे यांच्या कोलांट्या
राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्या बंडात त्यांच्यासोबत गेले. मात्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे ही थोरल्या पवारांबरोबरच राहिली. आपल्याला तिकीट मिळेल या आशेने गायत्री शिंगणे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. त्याच्या टीकेचा रोख राजेंद्र शिंगणे यांच्याकडेच होता. अजित दादांसोबत राहून राजेंद्र शिंगणे यांनी अनेक कामे करून घेतली. पण आयत्यावेळी अजित दादांना टांग देऊन शिंगणे शरद पवारांकडे गेले. त्यामुळे चिडलेल्या गायत्री शिंगणे यांनी समाज माध्यमावर " हेच काय आमच्या निष्ठेचे फळ?" असा प्रश्न शरद पवार यांना विचारला होता. शिंगणे यांनी आयत्यावेळी घात केल्यामुळे अजित पवार देखील चिडले होते आणि त्यांनी मतदारसंघात अन्य उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्न केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेतेही या मतदारसंघासाठी आग्रही होते. अखेरीस हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांना सोडण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिली. खेडेकर यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.
खेडेकर हे लोकप्रिय व्यक्तिमत्व
शशिकांत खेडेकर हे नाव सिंदखेड राजा मतदारसंघाला चांगलेच परिचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात कार्यरत आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षामधून झाली. डॉ. खेडेकर हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पुढे आले. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापतीही राहिले. 1999 ला काँग्रेसने त्यांना सिंदखेडराजाची उमेदवारी न दिल्यामुळे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळांच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत देखील त्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न केले.
दोन पराभवानंतर विजय
2004 ला त्यांना सिंदखेडराजा मतदारसंघातून त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. 2009 मध्येही शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी दंड थोपटले होते. मात्र दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2014 ला तिसऱ्यांदा शिवसेनेने डॉ. खेडेकर यांनाच मैदानात उतरविले. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत मात्र डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शशिकांत खेडेकर यांचा 9000 मतांनी पराभव केला. तेव्हापासून खेडेकर काहीसे अज्ञातवासात होते. त्यातच 2022 साली शिवसेनेत बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले.
शिवसेनेचे 40 आमदार आणि आठ मंत्री तसेच अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा दिला. ज्याचा आमदार त्याची जागा असे सूत्र महाविकास आघाडीत ठरले असल्यामुळे सिंदखेड राजाची ही जागा राष्ट्रवादीच्या शिंगणे यांना जाणार असेच चित्र होते. त्यामुळे खेडेकर यांच्या भवितव्याचा प्रश्न होता आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणे पसंत केले. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या आमदारांसह सरकारमध्ये सहभाग घेतल्यामुळे खेडेकर यांच्या उमेदवारीचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला होता. पण शिंगणे यांनी पुन्हा शरद पवार यांचाच हात धरल्यामुळे खेडेकर यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
लोकसंपर्क ही जमेची बाजू प्रचंड लोकसंपर्क आणि मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे खेडेकर हे मतदारसंघात लोकप्रिय आहेत. त्याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत निर्माण झालेली नाराजी आणि गटबाजी खेडेकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सिंदखेडराजा मतदार संघात मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे त्याचा लाभ देखील खेडेकर यांना मिळण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications