Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टपरी चालक ते मंत्री गुलाबराव पाटील यांचा असा अद्भुत प्रवास

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र घेऊन शिवसेना या लढाऊ आणि आक्रमक संघटनेची बांधणी केली. जात-पात घराणे न पाहता लाखो शिवसैनिकांची मोट बाळासाहेब ठाकरे यांनी बांधली. विस्थापितांची संघटना ही शिवसेनेची खरी ओळख होती. प्रस्थापित पक्षांतील प्रस्थापित घराण्यामुळे राजकीय संधी न मिळालेले हजारो वंचित तरुण शिवसेना या चार अक्षरांभोवती गोळा झाले. कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या शेकडो तरुणांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. त्यासाठी प्रस्थापितांशी प्रचंड मोठा लढा दिला. प्रशासनाशी दोन हात केले. आणि महाराष्ट्रातील लाखो लोक अशा शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. साधा टपरी चालक ते राज्याचा पाणीपुरवठा मंत्री असा प्रवास करणारा असाच एक शिवसैनिक म्हणजे गुलाबराव पाटील.

प्रचंड आक्रमकता, संघटन कौशल्य, अफाट वक्तृत्व, कोणतीही मोठी सभा एक हाती जिंकून घेण्याची हातोटी, कार्यकर्त्यांचे मोहोळ गोळा करण्याचा स्वभाव आणि कोणत्याही समस्येला आणि आव्हानाला बेडरपणे भिडण्याची तयारी ही गुलाबराव यांची वैशिष्ट्ये. शिवसेना या आक्रमक पक्षाला साजेसे असे हे आक्रमक व्यक्तिमत्व. त्यांची राजकीय कारकीर्द देखील तशीच आक्रमक आणि बेधडक राहिलेली आहे.

Gulabrao Patil

गुलाबराव पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत सर्वसामान्यांचे लोकनेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले. कोणताही राजकीय वारसा नसतांना केवळ संघटन कौशल्य व वकृत्वशैलीमुळे त्यांनी जनमानसात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचे मूळ गाव लाडली ता. धरणगाव, जिल्हा जळगाव असून त्यांचं जन्म गाव व हल्ली राहत असलेले गाव पाळधी ता. धरणगाव, जिल्हा जळगाव आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाळधी गावात तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव शहरात झाले आहे.

ऐन पंचविशीत शिवसेनेत

त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी पाळधी येथे शिवसेनेची शाखा उघडली. ते स्वतःच शाखा प्रमुख होते. 1991 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चाळीसगांव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये गुलाबराव पाटील यांना भाषणाची संधी मिळाली व तेथे त्यांचे भाषण खुपच प्रभावी झाले. तोच त्यांच्या कारकीर्दीचा टर्निंग पोइंत होता. शिवसेना आणि गुलाबराव पाटील हे नाते तेव्हापासून अगदी घट्ट झाले. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळाव्याला त्यांची उपस्थिती राहिलेली आहे.

1992 मध्ये ते एरंडोल पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले. याच काळात धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून त्यांची निवड झाली. 1995 ते 1999 या कालावधीत त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केले.1997 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद जळगांवच्या कृषी समितीच्या सभापती पदावर निवड झाली.

पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश

1999 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या तिकिटावर एरंडोल विधानसभा मतदार संघात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. 1999, 2004 असे सलग विजय त्यांनी मिळविले.2010 मध्ये शिवसेना पक्षाचे उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली.2014 च्या पंचवार्षिक निवडणूकीत ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.जुलै 2016 मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. परभणी जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली.2019 मध्ये जळगाव ग्रामीण मधुन ते विजयी झाले. उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदात त्यांनी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जळगाव व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली.

मतदारसंघात अनेक विकासकामे

त्यांच्या कार्यकाळात ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या विधानसभा मतदारसंघात विकासाची आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे करण्यात आली. तब्बल 132 कोटी रुपये खर्च करून भोकर येथील पूल उभारण्यात आला. 110 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हसवडचा रेल्वे उड्डाणपूल हे देखील त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे. प्रचंड पाठपुरावा करून त्यांनी धारावा ते धरणगाव या पाणीपुरवठा प्रकल्पाची पूर्तता केली. 67 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प सध्या उभारण्यात येत आहे. त्यांच्याच पाठपुराव्याने धरणगाव येथे तालुका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली असून धरणगाव तालुक्यातील हजारो नागरिकांना त्याचा लाभ होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने आपल्या मतदारसंघात तब्बल वीस हजार लाभार्थींना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ

2022 साली शिवसेना पक्षात मोठे उलटफेर झाले. 40 आमदार आणि 8 मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यात गुलाबराव पाटील यांचा देखील सहभाग होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राउत यांच्या हल्ल्यांना गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या आमदारांना ते सभागृहात देखील भिडले.

पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज

अडल्या नडल्या प्रत्येक व्यक्तीला मदत हा प्रत्येक शिवसैनिकाचा स्थायीभाव असतो. गुलाबराव पाटील हे देखील या स्वभावाचे प्रतिनिधी आहेत.अंगावर आले तर थेट शिंगावर घ्यायचे हा देखील त्यांचा खाक्या आहे.सभागृहात त्यांनी आपली तसेच आपल्या पक्षाची भूमिका नेहमीच हिरिरीने मांडली.त्यांची अनेक भाषणे सभागृहात गाजली आहेत.जे करायचे ते ठामपणे करायचे आणि शेवटपर्यंत निभावून न्यायचे हे देखील गुलाबराव पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेच्या या बिनीच्या शिलेदाराला एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. आज पर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि आपले वक्तृत्वावर गुलाबराव पाटील पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+