नेमकं काय आहे 'ऑपरेशन टायगर'? ठाकरे गटाचे खासदार फुटणार? निवडणुकांपूर्वीच वातावरण पेटलं
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआनं बाजी मारली. मात्र सहा महिन्यांतच महायुतीने विधानसभेला गेम फिरवला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा पक्षांची फोडतोड सुरु झाली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरु झाली आहे.नेमके काय आहे ऑपरेशन टायगर? ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार का? याच विषयी आपण माहिती घेणार आहोत...

कशी सुरु झाली चर्चा?
गेल्या आठवड्यात धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. त्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगर हा शब्द वापरला. ठाकरे गटाचे खा. ओमराजे निंबाळकर हे महायुतीचेच आहेत, असा उल्लेख सरनाईक यांनी केला. त्यानंतर मात्र शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे, या चर्चा सुरु झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार व आमदार फोडून ते शिंदे गटात आणायचे हेच ऑपरेशन टायगर असल्याचे सांगितलं गेलं.
काय म्हणाले खा. निंबाळकर
प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पक्षबदलाच्या चर्चेला साफ नाकारले. ठाकरे यांच्यामुळेच मी एकदा आमदार व दोनदा खासदार झालो. त्यामुळे त्यांना सोडण्याचा प्रश्नच नाही, असं निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. निवडणुका संपल्या की विरोध संपतो, असं प्रताप सरनाईक यांना म्हणायचं असेल, असंही खा. निंबाळकर यांनी त्यावेळी सांगितलं.
निंबाळकरांची पुन्हा चर्चा
ऑपरेशन टायगरची आता पु्न्हा एकदा चर्चा सुरु झाली, ती खा. ओमराजे निंबाळकर यांच्यामुळेच. खासदार ओमराजे निंबाळकर यांची एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. मात्र या पोस्टमधून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाची फोडाफोडी पुन्हा सुरु होईल, असं काहींचं म्हणणं आहे.












Click it and Unblock the Notifications