"गडकरींच्या उंचीची व्यक्ती दिसत नाही!" शरद पवारांकडून नितीन गडकरींवर दिल्लीत स्तुतीसुमनांचा वर्षाव
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एका विशेष सोहळ्यात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिंतामणराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना, शरद पवारांनी गडकरींच्या कार्याचे भरभरून कौतुक करत, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. गडकरींच्या कामाची दखल केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीतही घेतली जात असल्याचे पवारांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

"७० टक्के खासदार गडकरींच्या कामाचे कौतुक करतात!"
शरद पवार म्हणाले, "राजधानीत ज्यांनी कर्तृत्व गाजवले, त्यांच्यावर पुस्तक लिहिले जात आहे. दुसऱ्या बाजूला सी.डी. देशमुख यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असून, तो नितीन गडकरींना मिळत आहे, याचा मला विशेष आनंद आहे." गडकरींचे काम फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पवार पुढे म्हणाले, "कोणत्याही खासदाराला विचारले, तरी ते नितीन गडकरींबद्दल नेहमीच चांगले बोलतात, त्यांच्या कामाचे कौतुक करतात. जवळपास ७० टक्के खासदार आम्हाला सांगतात की, त्यांना गडकरींच्या कामावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच, गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत नाही," अशा शब्दांत पवारांनी गडकरींबद्दल आपले मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानाने सभागृहात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
स्वातंत्र्यापूर्वीच्या आठवणींना उजाळा
आपल्या भाषणात शरद पवारांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "स्वातंत्र्यापूर्वीच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर, सी.डी. देशमुख यांसारखी मोठी माणसे होती, ज्यांच्या दूरगामी नियोजनामुळे देशावर अनेक सकारात्मक परिणाम झाले. दक्षिणेकडील अनेक राज्यांना आजही वीज मिळते. सी.डी. देशमुख यांचा करन्सी हा आवडीचा विषय होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष झाला, त्यात लोक हुतात्मा झाले, त्यावेळी त्यांनी नेहरूंना स्पष्टपणे सांगून राजीनामा दिला."
पवारांनी देशाच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष मावळणकर, देशावर आक्रमण झाले तेव्हा संरक्षण मंत्री झालेले यशवंतराव चव्हाण आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान देणारे काकासाहेब गाडगीळ यांचीही आठवण करून दिली. "१९६७ मध्ये मी विधानसभेला उभा राहिलो, त्यावेळी माझे लोकसभेचे उमेदवार खाडिलकर होते, आम्ही एकत्र काम केले. कोकण रेल्वेचा निर्णय मधू दंडवते यांनी घेतला, ती खाली केरळपर्यंत जाते," अशा आठवणीही पवारांनी सांगितल्या.
"मराठीचा मला अभिमान!" - गडकरी
पुरस्कार स्वीकारताना नितीन गडकरींनी नम्रता व्यक्त केली. "सी.डी. देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्याची माझी पात्रता आहे की नाही माहिती नाही," असे म्हणत त्यांनी पुरस्कार स्वीकारला. ते पुढे म्हणाले, "काळाच्या ओघात आपण अनेक गोष्टी विसरतो, विस्मृती ही माणसाला मिळालेली देणगी आहे. मला मराठीचा अभिमान आहे, आणि हिंदीचाही तितकाच अभिमान आहे."












Click it and Unblock the Notifications