Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवसेनेचा आश्वासक चेहरा; संजय शिरसाट, रिक्षाचालक ते 3 वेळा आमदार, संभाजीनगरचे रुप बदलणारा नेता

Sanjay Shirsat face of Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत येण्यापूर्वी आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी रीक्षा चालवत असत हे सर्वज्ञात आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशाच कष्टकरी आणि सामान्य तरुणांच्या घामावर आणि रक्तावर वाढली. या तरुणांनी आपल्या मेहनतीने आणि कष्टाने शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवला. प्रस्थापिता विरोधातील या शिवसैनिकांची लढाई सोपी नव्हती. पण बाळासाहेबांच्या विचाराने भारलेल्या जिगरबाज शिवसैनिकांनी हा आपला लढा यशस्वी केला आणि प्रस्थापितांच्या पायाखालून सत्तेची जाजमे अक्षरशः खेचून आणली. अशा कष्टाळू तरुणांपैकी एक नाव म्हणजे आमदार संजय शिरसाट.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यानंतर शिवसेनेचा विस्तार केला तो मराठवाड्यात. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामुळे मराठवाडा धगधगत होता. प्रस्थापित पक्षांच्या प्रस्थापित नेतृत्वामुळे विस्थापित असलेल्या तरुणांचे जत्थेच्या जत्थे नव्या नेतृत्वाच्या शोधात होते. निखारे पेटत होते आणि त्याला फुंकर देण्याची गरज होती. ती फुंकर मारली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठवाड्यात त्यांनी झंझावाती दौरे केले.

Sanjay Shirsat face of Shiv Sena rickshaw puller to 3 time MLA

शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आणि संपर्कप्रमुखांनी संपूर्ण मराठवाडा अक्षरशः ढवळून काढला. एक एक माणूस शोधला आणि त्याला संधी दिली. दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेचा प्रचंड विस्तार केला. बाळासाहेबांनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी मराठवाडा गाजवून टाकला. शिवसेनेने मराठवाड्यात केलेली ती एक प्रचंड मोठी राजकीय घुसळण होती. आणि या घुसळणीतून कौटुंबिक पार्श्वभूमीचा चेहरा मोहरा नसलेले अनेक तरुण पुढे आले त्यातला एक तरुण म्हणजे संजय शिरसाट.

बाळासाहेबांचा विलक्षण प्रभाव

व्यवसायाने रिक्षा चालक असलेले संजय शिरसाट बाळासाहेबांच्या प्रभावामुळे शिवसेनेकडे खेचले गेले आणि त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. संभाजीनगर पश्चिम आणि बन्सीलाल नगर हा त्यांचा इलाका. बन्सीलाल नगर परिसरातून त्यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक पद भूषवले. ते सभागृह नेतेही झाले. शिवसेनेत विभागप्रमुख पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आली होती.

2009 साली काँग्रेसच्या पारखे नामक उमेदवाराला पराभूत करून संजय शिरसाट पहिल्यांदा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत गेले. 2014 च्या निवडणुकीत दुसऱ्यांदा ते विजयी झाले. नंतर ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही विजयी झाले. त्यावेळी त्यांची राजू शिंदे यांच्याशी लढत झाली होती. अशा रीतीने सलग तीन वेळा विधानसभेत पोहोचणारे ते शिवसैनिक ठरले.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा

2022 साली शिवसेनेत पक्ष नेतृत्वात बदल झाला आणि एकनाथ शिंदे यांना 40 आमदार आणि आठ मंत्र्यांनी पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांना सुरुवातीपासून पाठिंबा देणारा मोहरा म्हणजे संजय शिरसाट होते. शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती परंतु राजकीय घडामोडीत त्यांचे नाव काहीसे मागे पडले. मात्र त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. शिवसेनेच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत संयमाने आणि संयतपणे पार पाडली.

कोरोना काळातील सेवाकार्य

कोरोनाच्या काळात त्यांनी घराघरात मदत पोहोचवली. गरजू नागरिकांना मदत केली. रोगप्रतिकारशक्तीवर्धक औषधे ठिक-ठिकाणी पोहोच केली. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची असंख्य कामे केली. बीड बायपास रस्ता प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये देणे राज्य सरकारकडून मंजूर करून घेतले. देवळाई विभागातील रस्त्याची दर्जोन्नती महत्त्वाची ठरली आहे. झाल्टा फाटा ते छत्रपती संभाजीनगर बसस्थानक हा सात ते आठ किलोमीटरचा रस्ता त्यांनी अद्यावत करून घेतला. देवळाई येथील भूमिगत रस्ता देखील शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे.

रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून त्याने पायाभूत सुविधांना मतदारसंघात गती दिली. शिवपुतळा उभारणी, सभागृह, डोम, अंतर्गत रस्ते चांगले करून त्यांनी लोकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. शहरातून जाणाऱ्या बायपास पूर्वी एक पदरी होता तिथे दररोज किमान एक अपघात घडायचा. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवायला सुद्धा लोक घाबरत असायचे. संजय शिरसाठ यांनी हा बायपास चार पदरी करून घेतला त्यामुळे दोन वर्षात तिथे एकही अपघात झालेला नाही.

संघटनात्मक आणि विकासाचीही ताकद

संघटनात्मक ताकदीबरोबरच विकास कामांची ताकद देखील संजय शिरसाट यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. संभाजीनगर पश्चिम शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे 70 टक्के हिंदू धर्मीय मतदार आहेत. आतापर्यंत येथील मतदारांनी संजय शिरसाट यांना चांगली ताकद दिली आहे. यावेळेस उद्धव ठाकरे गटातून राजू शिंदे यांनाच उमेदवारी दिली जात आहे. आतापर्यंत केलेली विकास कामे, एकनाथ शिंदे यांचा करिष्मा, लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांमध्ये गेलेला संदेश यामुळे संजय शिरसाठ यांना संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून अधिक संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+