अजित पवार म्हणाले- मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं; तुमचा पक्ष शहा चालवतात- राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले, तर भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात होतील. हे त्यांना स्वतः अमित शाह यांनी सांगितले आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, असे विधान केले, त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना खोचक टोला लगावला.
महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यानंतर मुख्यमंत्रीपदावरून अनेक चर्चा रंगल्या. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, यानंतरही अनेकदा मुख्यमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात चर्चा चालूच आहेत. एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपा नेते असतील, अनेकदा मुख्यमंत्रीपदावरून दावा प्रतिदावा करत आले. यातच अजित पवार यांनी पुन्हा मनातील गोष्ट बोलून दाखवली. त्यावरुन पुन्हा राजकीय वर्तुळा चर्चा रंगली आहे. अशातच पत्रकारांशी संजय राऊत यांना अजित दादांच्या मनातील गोष्टीवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार टोला हाणला.

अजित पवार काय म्हणाले, ते आधी जाणून घ्या?
अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी एका कार्यक्रमात मांडले. त्यावर अजित पवार म्हणाले की, आपल्याला सगळ्यांना तसे वाटत असते, पण शेवटी योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमते. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असे नाही, असे स्पष्ट मनातील भावना अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मांडली.
काय म्हणाले संजय राऊत?
अजित पवारांच्या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की, योग कसा येणार? मी नेहमी सांगतो की, छगन भुजबळ शिवसेनेत असते, तर मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते, तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी हे अखेर मुख्यमंत्री झाले ना. ते पक्षासोबत राहिले.
दुसरी बाब म्हणजे, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले, तर भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात त्यांना संधी मिळू शकते, हे त्यांना स्वतः अमित शाह यांनी सांगितले आहे, असा दावाच संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात
जोपर्यंत वेगळा गट आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला, तर भविष्यात भाजपाचा चेहरा म्हणून संधी मिळू शकते. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात. एक भाजपा, दुसरा एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि तिसरा अजित पवारांचा पक्ष, असेही संजय राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications