नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा अचानक का सुरू झाली? राजकीय वर्तुळातून धक्कादायक प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात वयाची पंच्याहत्तरी पूर्ण झाल्यानंतर थांबणं अपेक्षित असल्याचे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. "नरेंद्र मोदी यांचं निवृत्त होणं हे देशासाठी शुभसंकेत आहेत," असं ते म्हणाले.

"स्वतः बनवलेला नियम आता पाळावा लागेल" - संजय राऊत
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊतांना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या निवृत्तीबाबत विचारणा झाली. त्यावर बोलताना ते म्हणाले, "सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होणार आहेत. त्यांच्या दाढीतील पांढरे केस, टक्कल पडलेलं डोकं, जगभर फिरून झालंय, सत्तेची सर्व सुखं उपभोगली आहेत. आता त्यांना निवृत्त व्हायला हवं."
राऊत पुढे म्हणाले, "RSS कडूनही त्यांना सूचनांचा मारा सुरू आहे की, आता थांबा, देश पुढच्या हातात द्या. याच नियमाचा आधार घेत नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांच्यावर निवृत्ती लादली होती. आता स्वतःवर तोच नियम लागू करावा लागेल."
"निवृत्ती नंतरही कार्याची संधी"
अमित शाह यांच्या निवृत्तीनंतर काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगून संजय राऊत म्हणाले, "निवृत्तीनंतर अनेक चांगली कामं करता येतात. नानाजी देशमुख यांचं उदाहरण समोर आहे. त्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान दिलं."
"हे संकेत देशासाठी चांगले"
राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील, तर ते देशासाठी नक्कीच चांगले संकेत आहेत. सत्तेवर दीर्घकाळ राहिल्यानंतर एका मर्यादेनंतर निवृत्ती स्वीकारणं हेच उचित असतं. अशा वेळी नवा नेतृत्व पुढे येण्याची संधी मिळते."












Click it and Unblock the Notifications