एकनाथ शिंदेंसोबत नेमकं होतयं काय? शिरसाटांच्या व्हिडिओनंतर आता संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल
शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमध्ये अन्नाच्या गुणवत्तेवरून वाद घालून त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणात आता गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही या घटनेतील पहिली अधिकृत कारवाई मानली जात आहे.
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गायकवाड यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीवर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे IPC कलम 352 आणि 115(2) अंतर्गत ही नोंद करण्यात आली आहे.
तसेच, या गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्षांना अधिकृतपणे कळवली जाणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया: "पश्चाताप नाही"
या प्रकरणावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "मुख्यमंत्री जर विधानसभेच्या नियमांनुसार बोलावले गेले असतील, तर ते त्यांनी त्यांच्या जबाबदारीनुसार केलं. आम्ही असं काही मोठं केलं नाही की त्यामुळे सरकार अडचणीत येईल. अशा अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नाही. हे फक्त विरोधकांच्या समाधानासाठी केलं गेलं असेल."
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद झाल्याची माहिती देत त्यांनी सांगितलं की, "शिंदे साहेबांनी मला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला."
घटनेचा तपशील काय?
ही घटना मंगळवारी घडली. संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कॅन्टीनमधून जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र, त्यातील दाळीला वास येत होता आणि भात शिळा होता, असा आरोप करत त्यांनी कर्मचाऱ्याशी वाद घालून शारीरिक मारहाण केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
या घटनेनंतर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला आणि विरोधी पक्षांनी या प्रकाराचा कडक शब्दांत निषेध करत तातडीने कारवाईची मागणी केली.












Click it and Unblock the Notifications