राज-उद्धव ठाकरेंचं पहिलं एकत्र आवाहन, मराठीजनांना विजयी मेळाव्यासाठी वाजत गाजत येण्याचं निमंत्रण
त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) विजयी मेळावा साजरा करणार आहेत. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. सकाळी 10 वाजता या विजयी मेळाव्याला सुरुवात होईल.

शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. याचदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकत्र आवाहन केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक काढत सर्वांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे. "आवाज मराठीचा..." असं म्हणत, "मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं... कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं... आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या... आम्ही वाट बघतोय..." असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरूण सरदेसाई, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विजयी जल्लोष मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने आज रात्री 9:30 वाजता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून NSCI ची पाहणी करण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications