पुणे विद्यापीठाच्या SET परीक्षेतून 'SBC' आरक्षण हटवले; विद्यार्थी संतापले, आता खुल्या प्रवर्गातून..
Pune Latest News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत (SET) आरक्षणाच्या धोरणातून विशेष मागास प्रवर्गासाठी (SBC) असणारे आरक्षण काढून हटविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातच SBC चे आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
15 जून रोजी होणार सेट परीक्षा
विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे 40वी सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 15 जून रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी नोडल एजन्सी म्हणून पुणे विद्यापीठ काम पाहते.

राज्यातील या शहरांमध्ये होणार ही परीक्षा
ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
दरम्यान, या परीक्षेच्या आरक्षण धोरणात 'एसबीसी'चे आरक्षण नमूद न केल्याने परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावा लागत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले.
गेल्यावर्षी आरक्षण यंदा आरक्षण का हटवले?
गेल्या वर्षापर्यंत सेट परीक्षेचा अर्ज भरताना 'एसबीसी'चे आरक्षण लागू असल्याचे माहितीपत्रकात नमूद करण्यात आले होते. परंतु, यंदा परीक्षेच्या पात्रता निकषात नमूद केलेल्या आरक्षण धोरणाच्या मुद्यात 'एसबीसी'च्या आरक्षणाचा मुद्दाच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्हाला खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावा लागणार आहे, असेही विद्यार्थ्याने सांगितले आहे.












Click it and Unblock the Notifications