Pune News : पुण्यातील गुडलक कॅफेला दणका! परवाना तर निलंबितच पण आता ठोकले टाळे; काय आहे प्रकरण? वाचा
Pune News Goodluck Cafe locked license suspended : नेहमीच पुणेकरांचा आणि नटनट्यांचा वावर असलेल्या पुण्यातील गुडलक कॅफेला टाळे ठोकण्यात आले आहे. गुडलक कॅफेला टाळे ठोकण्याच्या प्रकाराने अनेक खवय्यांना धक्का बसला आहे पण कारणच तसे आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, पुणे अन्न आणि औषध प्रशासनानाने स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून पुण्यातील प्रसिद्ध 'कॅफे गुडलक' चा परवाना तात्पुरता निलंबित केला आहे आणि त्यामुळेच या कॅफेला टाळे ठोकण्यात आले आहे.

का ठोकले गुडलक कॅफेला टाळे?
तीन दिवसांपुर्वी पुण्यातील गुडलक कॅफेमध्ये अन्नपदार्थाच्या बनमध्ये काचेचे तुकडे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, या कॅफेत बनमध्ये एका ग्राहकासोबत हा प्रकार घडला होता. याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकण्यात आला त्यानंतर प्रशासनाने संबधित प्रकरणात लक्षत्र घातले.
गुडलक कॅफेमध्ये त्यांनी ऑर्डर केलेल्या "बन मुस्का" मध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा दावा एका जोडप्याने केल्यानंतर ही कथित घटना उघडकीस आली. या जोडप्याने या भागाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.
पुण्यातील या प्रकाराने खवय्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली कारण गुडलक कॅफे अनेकांसाठी नेहमीचाच अड्डा येथील बन-मस्का हा फेमस आहे. जो कुणी शहरात येतो तो बन-मस्का खातोच अशी या कॅफेची खासीयत आहे. पण या कॅफेतील बनमध्ये काचेचा तुकडा सापडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने या कॅफेचा परवाना निलंबित केला. त्यानंतर आज टाळे ठोकत कारवाई करण्यात आली आहे.
कधीपर्यंत राहणार टाळे?
प्राप्त माहितीनुसार आणि मिडिया रिपोर्टनुसार, " गुडलक कॅफेची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये काही अस्वच्छताही आढळून आली. त्यामुळे पुढील आदेश आणि आवश्यक पालन होईपर्यंत भोजनालयाचा परवाना निलंबित केला आहे," असे एफडीएचे सहआयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. अन्नपदार्थात काचेचे तुकडे आढळल्याच्या वृत्तांची दखल घेत एफडीएने अन्नपदार्थाची तपासणी केली असेही ते म्हणाले.
गुडलक कॅफेची खासीयत काय?
गुडलक कॅफे हा तरुणाईसाठी फेमस कॅफे आहे, या ठिकाणी नाट्यगृह असल्याने मराठी स्टार्स आणि तारकांची या ठिकाणी गर्दी होते. अगदी नाट्यप्रयोगासाठी जो येईल तो या कॅफेत बसणारच असे ठरलेले समीकरण आहे. यासह रोजचीच वर्दळ येथे असते आणि परंपरागत कॅफे चालवला जातो. हा पुण्यातील जुना कॅफे असून त्याची रचनाही जुनीच आहे.












Click it and Unblock the Notifications