बाथरूमातून 8 कमांडों घुसले, 40 मिनिटांत किडनॅपरचा खात्मा; 17 मुलांच्या सुटकेची वाचा इनसाईड स्टोरी
Powai Hostage Rescue : गुरुवारी दुपारी (३० ऑक्टोबर २०२५) मुंबईतील पवई परिसरात एका चित्रपटाच्या ऑडिशनच्या नावाखाली सुरू झालेली घटना केवळ ३५ मिनिटांत एका धोकादायक नाट्यात रूपांतरित झाली.
आरए स्टुडिओमध्ये ३८ वर्षीय रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने १७ लहान मुलांना, एका वृद्ध पुरुषाला आणि एका महिलेला ओलीस (बंधक) ठेवले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या क्विक रिअॅक्शन टीमने (QRT) अत्यंत जलद आणि थरारक कारवाई करत सर्व बंधकांची सुखरूप सुटका केली.

बाथरूममधून कमांडोची 'सीक्रेट एन्ट्री'
दुपारी २ वाजताच्या सुमारास पवई पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ परिसराला वेढा घातला. मुलांचा जीव धोक्यात न घालता आरोपीला पकडणे हे सर्वात मोठे आव्हान होते. कमांडरने सुरुवातीला रोहित आर्यशी बोलून परिस्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आर्यने बंदूक (एअर गन) आणि रसायने उगारून जवळ येणाऱ्या कोणालाही गोळीबार करण्याची आणि जाळून टाकण्याची धमकी दिली. कोणताही धोका पत्करता येणार नाही, याची खात्री झाल्यावर, आठ सदस्यीय पोलिस कमांडो टीमने अत्यंत गुप्तपणे बाथरूमच्या बाजूने आत प्रवेश केला.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी रोहित आर्य जखमी झाला आणि केवळ ३५ ते ४० मिनिटांत हे संपूर्ण ऑपरेशन यशस्वी झाले. पोलिसांनी नंतर सांगितले की, जरी त्याची बंदूक एअर गन होती, तरी त्या धोकादायक क्षणी 'कोणताही रिस्क घेणे योग्य नव्हते.
मुलांची सुखरूप सुटका
हल्ला झाल्यावर ऑडिशन रूममध्ये गोंधळ उडाला. मुले भीतीमुळे कोपऱ्यात लपून बसली होती. कमांडो टीमने अत्यंत सावधगिरीने पुढे जात सर्व १७ मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीनंतर मुलांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव!
मृत आरोपी रोहित आर्यने हे धोकादायक पाऊल का उचलले, याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्य व्हिडिओमध्ये सतत सांगत होता की, त्याची मागणी पैशासाठी नसून "नैतिक आणि न्यायाशी संबंधित" आहे. त्याला फक्त काही लोकांची चौकशी करायची होती. पोलिसांच्या माहितीनुसार, आर्यने यापूर्वी शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या प्रकल्पात काम केले होते. परंतु, या कामाचे पैसे न मिळाल्याने तो अनेक दिवसांपासून नाराज होता. या संदर्भात त्याने माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर निषेध देखील केला होता. याच रागातून आणि मानसिक तणावामुळे त्याने समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. आर्य आरए स्टुडिओमध्ये काम करत होता आणि यूट्यूब चॅनेल देखील चालवत होता.
घटनास्थळी रसायने आणि शस्त्रे जप्त!
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली असता, अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. एक एअर गन, काही रसायने आणि एक लायटर जप्त करण्यात आले. आरोपी मोठा स्फोट किंवा जाळपोळ करण्याची योजना आखत असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे.
उपचारादरम्यान मृत्यू, तपास सुरू
रोहित आर्यला गोळी लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता आरोपीचे व्हिडिओ, सोशल मीडिया आणि मागील रेकॉर्ड तपासणे सुरू केले आहे, जेणेकरून त्याने असे ओलीस ठेवण्याचे कृत्य का केले, यामागचे नेमके कारण आणि हे षडयंत्र होते का, हे शोधता येईल.












Click it and Unblock the Notifications