Net Worth : CM नव्हे तर स्वतःला 'कॉमन मॅन' म्हणणा-या शिंदेंकडे आहे करोडोंची संपत्ती
Eknath Shinde Net Worth : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले की, मी स्वत: पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांना फोन करून सांगितले. सरकार बनवताना कुठलीही अडचण नाही. तुम्ही तुमचा जो निर्णय घ्यायचा आहे तो एनडीए म्हणून आम्हाला मान्य असेल.
भारतीय जनता पार्टीसाठी जसा अंतिम आहे, तसाच एकनाथ शिंदे यांना देखील म्हणजेच शिवसेनेला देखील मान्य असणार आहे, अशी भूमिका शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे. तर आज आपण या लेखात एकनाथ शिंदे यांचा जन्म, शिक्षण, राजकीय राजकीय कारकीर्द आणि संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघावरील आपले वर्चस्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग पाचव्या वेळी सिद्ध केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते केदार दिघे यांचा दारुण पराभव केला आहे. त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रात 57 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत त्यांनी ज्या प्रकारे जागा जिंकल्या आहेत, त्यावरुन खरी शिवसेना कोणाची आहे हा दावा सिद्ध होतो. ऑटो चालक होण्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षा चालक, शिवसैनिक, नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री आणि मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला जन्म
एकनाथ शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दरे गावात 9 फेब्रुवारी 1964 रोजी एका मराठा कुटुंबात झाला. शिंदे यांनी ठाण्यातील मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात 11वीपर्यंत शिक्षण घेतले. शिंदे यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शाळा सोडली आणि ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली आणि 28 मार्च 2023 रोजी नवी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.
पाच वर्षांत संपत्ती 63.31 टक्क्यांनी वाढ
शिंदे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या पाच वर्षांत त्यांच्या एकूण संपत्तीत 63.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 73.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात एकूण 14.83 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती, तर 2019 मध्ये शिंदे यांची एकूण मालमत्ता ₹5.44 कोटी होती.
शिंदे यांच्याकडे 10.76 लाख किमतीची FD, ₹50,500 किमतीची ठाणे जनता सहकारी बँक (TJSB) चे शेअर्स, ₹59.87 लाख किमतीची LIC पॉलिसी आणि ₹7.92 लाख किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. त्याच्याकडे ₹2.50 लाख किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ₹2.25 लाख किमतीचे पिस्तूल देखील आहे.
2022 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळू लागल्यानंतर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. बघता बघता 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. भाजपच्या पाठिंबावर एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी भाजपा युतीचे मुख्यमंत्री देखील बनले. शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटापेक्षा चांगला स्ट्राइक रेट राखून एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले.












Click it and Unblock the Notifications