MVA च्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा! मुलींना 1 लाख, महिलांना दरमहा 3 हजार, तरुणांना देणार इतकी रक्कम!
MVA manifesto announced : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रसिद्ध केला. महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये दिले जाणार असून प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.
यासह महाविकास आघाडीने घोषणांचा पाऊसच पाडला असून अनेक योजना सत्तेत आल्यास सुरु करण्यात येईल असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याला आघाडीतील घटक पक्षांनी महाराष्ट्रनामा असे म्हटले आहे.

महिलांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
नोकरी शोधणाऱ्या तरुणांना मासिक 4000 रुपये मानधन
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, "नोकरी शोधणाऱ्या तरुणांना मासिक 4000 रुपये मानधन दिले जाईल... आमची 25 लाख रुपयांची आरोग्य विमा योजना सुरू झाली. अशोक गेहलोत राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रातही ते लागू केले जातील, आम्ही मोफत औषधे देण्याचे वचन देतो. आम्ही जात जनगणना करण्याचे ठरवले आहे आणि आम्ही तामिळनाडू राज्याच्या अनुषंगाने आरक्षणावर 50 टक्क्यांवर कमाल मर्यादा नेऊ." असेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय?
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
- जाती जणगणनना करणार
- 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
- दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
- 2.5 लाख नोकरभरती करणार
- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
- शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
- सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
- अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
- बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
- एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
- महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
- महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
- महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
- शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
- सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
- महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
- बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
- कंत्राटी नोकरभरती बंद करणार
महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत हे करणार?
- महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार
- महिलांचा बस प्रवास मोफत करणार
- सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
- जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार












Click it and Unblock the Notifications