Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बिघडलं नाही, तर घडलंय..! मुख्यमंत्रीपदासाठी मुरलीधर मोहोळांची चर्चा, भाजपचं धक्कातंत्र आलंय चर्चेत

BJP's shock tactics- कधीकाळी कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, सध्या मुख्यमंत्रीपदासाठी होऊ लागली आहे. भाजपने इतर राज्यात केलेल्या धक्कातंत्राचा वापर महाराष्ट्रातही होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर मोहोळ तरुण असल्याने भाजप त्यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा देईल, असे बोलले जात आहे. असे झाले तर, ते महाराष्ट्रासाठी खरोखर भाजपचे धक्कातंत्र ठरेल, असे दिसत आहे.

Muralidhar Mohol

मुरलीधर मोहोळांचे नाव चर्चेत

मुरलीधर मोहोळ हे तरुण मराठा चेहरा असल्याने भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ठेवल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप धक्कादायक नाव देण्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु आहे. मराठा समीकरण लक्षात घेत भाजप श्रेष्ठींकडून चाचपणी सुरु आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत तशी खलबतं झाल्याचीही चर्चा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु असे असतानाच अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

नगरसेवक ते थेट मुख्यमंत्री

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास हा स्वप्नवत आहे. कधीकाळी त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला आहे. त्यातूनच पुढे त्यांनी भाजपातून राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. मुरलीधर मोहोळ यांनी चार वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपदही भूषवले आहे. मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अमित शाह यांचे ते विश्वासू मानले जातात. मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्यासाठी खुद्द नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेतली होती. त्याच जोरावर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा सुमारे लाखभर मतांनी पराभव केला होता. पहिल्याच प्रयत्नात खासदारकी पटकवणाऱ्या मोहोळ यांच्या खांद्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचीही धुरा देण्यात आली आहे.

मोहोळांनी नाकारल्या चर्चा

मुरलीधर मोहोळांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यांनी म्हटलंय, "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे."

मोहोळांसाठी 'ही' कारणेही सकारात्मक

भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करतील, अशा शक्यता आहे. त्यामुळे भाजप मराठा मुख्यमंत्री देईल, असेही बोलले जात आहे. शिवाय भाजपने इतर राज्यात धक्कातंत्राचा वापर करत, थेट चर्चेत नसणाऱ्या तरुण चेहऱ्यांना मोठी जबाबदारी देण्याचे डाव खेळले आहेत. हाच डाव भाजप महाराष्ट्रातही खेळेल अशी शक्यता वाढली आहे. शिवाय मोहोळ हे मोदी-शहांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असेही काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+