मोठी बातमी! मनपा निवडणुकासाठी हालचाली! मतदान यंत्र सज्ज ठेवा - राज्याच्या निवडणूक आयुक्तांचे निर्देश
Municipal Election 2025 : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून मोठ्या हालचाली सुरु आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठीआवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करा अन् मतदानासाठी सज्ज ठेवा असे निर्देश दिले आहेत.
महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कालच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेत निर्देश दिले होते, त्यानंतर आज 11 जुलै 2025 रोजी ही महत्वाची बैठक पार पडली आहे.

काय म्हणाले राज्य निवडणूक आयुक्त?
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल.
मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केल्यास आपल्याला या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे सहज शक्य होईल असेही राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले.
राज्य निवडणूक सचिवांनी दिल्या सूचना
राज्य निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी यावेळी काही निर्देश देत सुचना केल्या. मतदाराची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करता येईल. त्या आधारे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. मतदान केंद्राचा अचूक अंदाज आल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आवश्यकतेबाबतही नियोजन करता येईल. मनुष्यबळाचाही अंदाज येईल. विभागीय आयुक्तांच्या समन्वयातून आजुबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून घेता येईल. एकूणच तयारीबाबतची सर्व तपशीलवार व अद्ययावत माहिती तयार ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. त्यावेळी ही माहिती सादर करावी.
या मतदारांना करता येणार मतदान
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी १ जुलैनंतर मतदार यादीत आपली नाव नोंदणी केली त्यांना मतदान करता येणार नाही अशी शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी एक जुलै 2025 पर्यंत विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता येईल जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली.












Click it and Unblock the Notifications