मोठी बातमी : एकाच वेळी 2 महाविद्यालयात प्रवेश घेता येणार! शिक्षण पूर्ण केल्यावर 2 पदव्या मिळणार!
Multidisciplinary education system : मुंबई विद्यापीठात बहुविद्याशाखीय शिक्षणाचं दालन खुलं झालं आहे. आता एकाच वर्षात दोन 2 काॅलेजमध्ये शिकता येणार आहे आणि विशेषतः दोन वेगवेगळ्या पदव्याही मिळू शकणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या धर्तीवर आणि आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या विविध संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी ही पाऊले उचलण्यात आली आहे.
या धर्तीवर मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवीसह पदवी आणि ट्विनींग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेतील आणि ज्ञानक्षेत्रातल्या ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध होतील.

विद्यार्थ्यांना काय होणार फायदा?
- दुहेरी पदवीच्या शिक्षणाअंतर्गत आता विद्यार्थ्यांला दोन महाविद्यालये किंवा दोन उच्च शिक्षण संस्थामध्ये एकत्र प्रवेश घेता येणार असून त्यास शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर दोन पदव्या मिळणार आहेत.
- दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत दोन्ही पदव्या डिस्टन्स-ऑनलाइन मोडमध्ये किंवा एका प्रत्यक्ष आणि एका डिस्टन्स मोडमध्ये दिली जाऊ शकते.
- याव्यतिरिक्त, या तरतुदीअंतर्गत दोन्ही डिग्री आता प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील. परंतु यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रितसर अनुमती घेऊन आणि शैक्षणिक सामंजस्य करार करणं गरजेचं राहणार आहे.
- दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत सहभागी संस्था-विद्यापीठांनी क्रेडिट्स किंवा कोर्सेसची ओव्हरलॅपिंग होणार नाही याची याची खात्री करणं आवश्यक राहील,
- प्रत्यक्ष मोडमध्ये दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर हे एकमेकांपासून 5-20 किलोमिटर अंतरावर असावं लागणार आहे.
विद्यापीठाची परवानगी आवश्यक
सहपदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठातील विविध विभाग आणि सलंग्न महाविद्यालये इतर उच्च शिक्षण संस्था किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार करु शकतील. परंतू असे शैक्षणिक करार करताना त्या शैक्षणिक संस्था क्युएस टॉप 1000/एनआयआरएफ टॉप 100/ किंवा नॅकची 'ए' श्रेणी असेल याची खात्री करावी लागेल. तसंच यासाठी विद्यापीठाची परवानगी घेणं बंधनकारक असेल.
मुंबई विद्यापीठानं उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने पाऊल टाकत सह पदवीच्या शिक्षणासाठी सेंट लुईस आणि मॉस्को स्टेट विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत, तर ट्विनिंग डिग्रीसाठी फ्रान्स आणि इटली इथल्या विद्यापीठांशी करार केलेले असून अनेक आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांशी करारांची प्रक्रिया सुरु असल्याचं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.
या बहुविद्याशाखीय शिक्षणक्रमांना प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि अनुषंगिक बाबींची माहिती ही सुरुवातीलाच कळविली जावी असंही त्यांनी ससांगितलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं बहुविद्याशाखीय शिक्षणामुळं दोन उच्च शिक्षण संस्थांमधील प्रगत ज्ञानशाखेचं सखोल अध्ययन आणि संशोधन तसंच ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळं शिक्षण प्रणालींमध्ये मोठा बदल पाहावयाला मिळणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतींच्या सामायिकरणाला यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल असेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीला विद्या परिषदेनी मान्यता दिली आहे. समितीच्या शिफारशीनुसार हे पद भरताना उदयोन्मुख क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन तसंच विद्यापीठ विभागानी उद्योग जगतातल्या आवश्यक गरजा आणि क्षेत्र ओळखून हे पद भरण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसेच एआयसीटीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं अवलंबन आणि धोरणाचं वार्षिक पुनरावलोकन करण्यात यावं अशीही शिफारस समितीनं केली आहे.












Click it and Unblock the Notifications