'सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर'; शिंदेंच्या आमदाराची दादांच्या प्रदेशाध्यक्षांवर जहरी टीका
रायगड जिल्ह्यात महायुतीत काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. तर तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे, अशा शब्दात जहरी टीका केली. थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार निशाणा साधला.
नेमका काय आहे वाद?
रायगड जिल्ह्यातील महायुतीत जागावाटपावरून वाद झाला. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) कडे गेला आहे. या मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं आव्हान असल्याचे सांगितले जात आहे. कारण, सुधाकर घारे अपक्ष लढणार असले तरीही त्यांना सुनील तटकरेंचं मोठं पाठबळ असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी स्वत: केला.

सुनील घारेंना तटकरेंचे अभय
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, राष्ट्रवादीचे उमेदवार सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंचं अभय आहे. सुनील तटकरेंच्या आशीर्वादामुळेच ते अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. महायुतीत असतानाही सुनील तटकरे यांनी जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. त्यामुळे मी हे इतरांच्या निदर्शनास आणून देत आहे. महायुतीचं सरकार आणण्याकरता तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम सुनील तटकरे करु लागले आहेत. महायुतीला लागलेला कॅन्सर म्हणजे सुनील तटकरे आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.
तटकरे माझा घात करु पाहत आहेत
महेंद्र थोरवे यांनी आरोप केला की, महायुतीमध्ये छेद पाडण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी महायुतीत यावी हे आम्हाला मान्य नव्हतं. शिवेसना, भाजपा, आरपीआय ही अभेद्य महायुती आहे. ही सक्षमपणे राज्यात उभी आहे. रायगड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर सुनील तटकरे ज्यांच्याशी गोड बोलले आहे, त्या प्रत्येकाचा काटा त्यांनी काढला आहे. अंतुले यांना सुनील तटकरेंनी राजकीयदृष्ट्या संपवलं. शेकापच्या जयंत पाटलांना संपवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं. आता ते माझा घात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सुनील तटकरेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी सुनील तटकरे यांना दिला.












Click it and Unblock the Notifications