मिलिंद देवरा यांची जादू वरळीत चालणार?, आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे यांच्याशी सामना
Milind Deora : देवरा या आडनावाला मुंबईच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. दक्षिण मुंबईतील राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित आणि नामांकित घराणे म्हणजे देवरा. शिवसेनेचे वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा हे याच देवरा कुटुंबातून येतात.
दक्षिण मुंबईतील श्रीमंत आणि औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या देवरा कुटुंबात मिलिंद देवरा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा खासदार होते. तत्पूर्वी त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले आहे. दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित औद्योगिक घराण्यांशी देवरा परिवाराचा निकटचा संबंध आहे. 1999 साली मुरली देवरा यांच्या प्रचारार्थ उद्योगपती धीरूभाई अंबानी रस्त्यावर आले होते तर मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी मुकेश अंबानी यांनी प्रयत्न केले होते.
मिलिंद देवरा यांनी 2004 आणि 2009 अशा दोन लोकसभा निवडणुकात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि ते मनमोहन सिंग मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाले. शहरांचा पायाभूत विकास, सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, अर्थव्यवस्था अशा विविध गुंतागुंतीच्या विषयांचा मिलिंद देवरा यांना अभ्यास आहे. संसदेत वेळोवेळी त्यांनी अशा प्रकल्पांचे जोरदार समर्थन केले आणि आपल्या खासदार निधीतून मोठा निधी अशा प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला.. उच्चशिक्षित, नेमस्त, सुसंस्कृत आणि उच्चभ्रू वर्तुळात उठबस असलेला राजकारणी म्हणून मिलिंद देवरा यांची ओळख आहे.

मोदी लाटेत पराभव
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. या लाटेत मिलिंद देवरा यांनाही पराभव पत्करावा लागला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून विजयी झाले. 2019 साली देखील मोदी लाट कायम होती आणि या लाटेत पुन्हा एकदा देवरा यांना पराभव पत्करावा लागला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट होते. मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी काही महिने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. लगोलग त्यांना राज्यसभा खासदारकी देण्यात आली. दक्षिण मुंबई हा मिलिंद देवरा यांचा बालेकिल्ला मानला जातो. तेथील काँग्रेसच्या वर्तुळात आजही देवरा यांना मानणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली. पण मतांच्या ध्रुवीकरणात जाधव यांना पराभव पत्करावा लागला. शिंदे यांनी देवरा यांना उमेदवारी दिली असती तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते, अशी चर्चा आजही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ऐकू येते.
शिवसेनेचा सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मिलिंद देवरा यांनी चांगले काम करून दाखवले आहे. शिवसेना हा लढाऊ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. थेट जनतेत मिसळून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची म्हणजेच शिवसैनिकांची संघटनेला ददात नाही. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातून अत्यंत अभ्यासूपणे आणि जबाबदारीने पक्षाची भूमिका मांडणाऱ्या अभ्यासू नेत्यांचा शिवसेनेत थोडा अभाव आहे. जे काही मोजके नेते शिंदे यांच्याकडे आहेत त्यात मिलिंद देवरा यांचा वरचा क्रमांक लागतो. हिंदी आणि इंग्रजी माध्यमात मिलिंद देवरा यांनी पक्षाची आणि राज्यातील महायुती सरकारची भूमिका अत्यंत समर्थपणे मांडल्याचे दिसून येते..उद्धव ठाकरे गटाच्या तोफखान्याला मिलिंद देवरा यांनी अत्यंत शांत आणि संयमी भाषेत उत्तर दिले. विकासाची भूमिका साध्या आणि सोप्या शब्दात मांडली. महायुतीच्या विविध प्रकल्पांचे आणि योजनांचे समर्थन केले. समाज माध्यमांतही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका नेटाने मांडण्यात मिलिंद देवरा सर्वात आघाडीवर आहेत.
स्थानिक शिवसैनिकांशी दांडगा संपर्क
लोकसभा निवडणुकीत पक्षाने संधी दिलेली नसली तरी मिलिंद देवरा यांनी संघटननात्मक पातळीवर संपर्क कायम ठेवला. दक्षिण मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे जवळचे कार्यकर्ते तसेच क्रियाशील शिवसैनिक यांच्याशी मिलिंद देवरा यांचा सातत्याने संपर्क असतो. राज्यसभा खासदार म्हणून प्राप्त झालेल्या अधिकारांत ते सर्वांना मदत करीत असतात. सलग दोन लोकसभा निवडणुका पराभव झालेला असला तरी देवरा यांची स्वच्छ प्रतिमा अजून कायम आहे. गेल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत देवरा यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही किंवा देवरा यांनीही पातळी सोडून कुणावरही टीका केलेली नाही. तसेच देवरा यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचे धाडस कुणीही दाखवलेले नाही. सभ्य आणि सुसंस्कृत अशीच ओळख मिलिंद देवरा यांनी कायम ठेवली आहे.
वरळी मतदारसंघातून संधी
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक 2024 साठी वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. वरळी हा उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. 2019 साली आदित्य ठाकरे यांना हा मतदारसंघ सुलभ व्हावा यासाठी तेथील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत घेतले होते. वरळीतच असलेल्या किशोरी पेडणेकर यांना महापौर पद आणि वरळीचेच आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समितीचे अध्यक्ष पद दिले होते. तर तळागाळात काम करून शिवसेना वाढवणाऱ्या सुनील शिंदे या शिवसैनिक आमदाराला विधान परिषदेचे वचन देण्यात आले होते. भाजपशी युती असल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सुनील निश्चित होता. आता याच मतदारसंघात मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे.
मराठी मतांचे विभाजन देवरा यांच्या पथ्यावर
गेल्या पाच वर्षात आदित्य ठाकरे यांना वरळी म्हणावे तसे लक्ष देता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना वरळी विधानसभा मतदारसंघात अवघ्या पाच- सहा हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. कोस्टल रोड प्रकल्पात कोळी बांधवांच्या समस्या सोडवल्यामुळे स्थानिक कोळी बांधव एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वरळीतील उच्चभ्रू आणि परप्रांतीय मध्यमवर्गीयांमध्ये मिलिंद देवरा यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. भाजपला मानणारा मोठा वर्ग वरळीत वास्तव्यास आहे. याच मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संदीप देशपांडे या बिनीच्या शिलेदाराला रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कट्टर मराठी मतदारात होणारे विभाजन मिलिंद देवरा यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications