हालचाली वाढल्या ! अजितदादांनी दोन दिवसांचा वेळ मागितला, कोकाटेंबाबतचा निर्णय फायनल?
मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली, त्यावेळी पवारांनी त्यांना याबाबत शब्द दिला आहे. याशिवाय, सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केल्याचे घाडगे यांनी सांगितले.

रमी खेळ प्रकरणानंतर कोकाटे अडचणीत
विधानमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात चांगलेच वातावरण तापले होते. या व्हिडिओमुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा आणि राडा
व्हिडिओ समोर आल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना, छावा संघटनेने त्यांना निवेदन देत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचवेळी काही कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे बसलेल्या टेबलावर पत्ते उधळले, ज्यामुळे राष्ट्रवादीचे आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या घटनेत विजय घाडगे यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर आज विजय घाडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
अजित पवार यांच्या भेटीनंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. तसेच, सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचेही पवारांनी सांगितल्याचे घाडगे यांनी नमूद केले.
भाजपच्या गोटातही हालचालींना वेग
एकीकडे ही घडामोड सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली असून, या बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications