एकनाथ शिंदेंचे विश्वासू दादा भुसे यांची मालेगाव बाह्य मध्ये पुन्हा बाजी, अद्वय हिरे यांचा पराभव
Maharashtra Assembly Election 2024 Result : उद्धव ठाकरे गटाने सर्वाधिक प्रतिष्ठेच्या केलेल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तथा मंत्री दादा भुसे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला असून मतदारसंघावर असलेले त्यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिलेले अद्वय हिरे चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून अपक्ष उमेदवार प्रमोद बंडू काका बच्छाव दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
दादा भुसे यांनी सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय कारकिर्दी सुरुवात केली. तळागाळात वावरणारा आणि सामान्य माणसात मिसळणारा नेता म्हणून त्यांची ओळख हळूहळू निर्माण होत गेली. मालेगाव शहर हे संवेदनशील शहर मानले जाते. मालेगाव मध्य मध्ये मुस्लिम मतदारांच्या वर चष्मा असून मालेगाव बाह्य मध्ये हिंदू मतदारांचा स्वर चष्मा आहे. मालेगाव मध्ये वेळोवेळी होणाऱ्या जातीय दंगलींमध्ये मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ ढाल म्हणून भूमिका बजावत असतो.

दादा भुसे गेले अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 2019 साली शिवसेना-भाजप युतीने विधानसभा निवडणूक लढली आणि त्यात युतीचा विजय झाला. मात्र उद्धव ठाकरे यांनी आयत्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान साधून महाविकास आघाडी सत्तेत आणली. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले. उद्धव यांच्या या मंत्रिमंडळात दादा भुसे हे मंत्री होते परंतु 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडात भुसे यांनी शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार मध्ये देखील दादा भुसे हे मंत्री होते. मंत्रीपद असून सुद्धा दादा भुसे यांनी सामान्य जनतेशी असलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे त्यांनी राबवली. सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाण्याचा आपला स्वभाव देखील त्यांनी कधी बदलला नाही.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक आमदारावर उद्धव ठाकरे यांचा राग आहे. दादा भुसे यांच्या विरोधातही उद्धव ठाकरे गटाने मोठी आघाडी उघडली. त्यांच्या मतदारसंघात अनेक सभा घेण्यात आल्या. दादा भुसे यांचे विरोधक असलेल्या अद्वय हिरे यांना पक्षात घेऊन संधी देण्यात आली. तसेच दादा भुसे यांचे निकटवर्तीय बंडूकाका बच्छाव यांनी बंडखोरी केल्यामुळे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबद्दल तर्क वितर्कांना मोठे उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनीही दादा भुसे यांना समर्थ साथ दिली. मालेगाव मधील हिंदू मतदार पूर्ण ताकतीनिशी दादा भुसे यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे दादा भुसे पहिल्या क्रमांकावर, बंडखोर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मोठा गाजावाजा करून पक्षात घेतलेले अद्वय हिरे चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. दादा भुसे यांच्या विजयामुळे उद्धव ठाकरे गट पुरता तोंडघशी पडला आहे आणि मालेगाव बाह्यवर दादा भुसे यांचे पुरते वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.












Click it and Unblock the Notifications