महिलाविषयक योजनांमुळे महायुतीचा "बाउन्स बॅक"; महिलावर्गात विश्वासार्हता; योजनांची प्रभावी अंमलबजावणी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार 2022 च्या जून महिन्यात कोसळले आणि शिंदे फडणवीस यांच्या शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरातच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे नेतृत्वाखाली लोककल्याणकारी योजनांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला. विशेषतः महिलांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविण्यात आल्या. ज्याचा लाभ कोट्यवधी महिलांनी घेतलेला आहे.
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीने तब्बल 31 जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. अँटी इन्कमबन्सीचा फटका महायुतीला बसणार अशी चर्चा असतानाच पुन्हा हरियाणा विधानसभेच्या निकालांचे जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या आत्मविश्वास पूर्ण वाढला आहे. त्यातच अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात विविध योजनांच्या घोषणा करून महायुतीने संपूर्ण चित्र जवळपास पालटून टाकले आहे. त्यामुळेच महायुतीचे नेते मोठ्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करताना दिसत आहेत.

लाडकी बहीण योजनेचा मास्टरस्ट्रोक
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ही महायुती सरकारची सर्वात महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. विरोधकांनी या योजनेची प्रचंड खिल्ली उडवली. ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. "या योजनेत जमा झालेले पैसे ताबडतोब काढून घ्या अन्यथा सरकार काढून घेईल, विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेला काही भविष्य नाही" अशी टीका महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी केली. परंतु शिंदे, फडणवीस आणि पवार या तिघांनीही वेगवेगळ्या व्यासपीठावर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा विश्वास जनतेला दिला. तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून, त्यातील बहुसंख्य महिलांच्या खात्यात तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत. निवडणूक काळासाठी या योजनेच्या अंमलबजावणीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली असली तरी एक महिन्याचा आगाऊ हप्ता सरकारने अधिक जमा केला आहे. रक्षाबंधनाच्या सुमारास या योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला. आता चौथा हप्ता प्रलंबित असून तो विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जमा करण्यात येईल. दोन कोटी 31 लाख महिलांना 17000 कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
लाभातून मिळालेल्या पैशांचा महिलांकडून सदुपयोग
प्रत्यक्ष मैदानाचा कानोसा घेतला असता या योजनेच्या लाभातून मिळालेले पैसे अनेक महिलांनी गुंतवले असून काही महिलांनी स्वयंरोजगार सुरू केल्याची उदाहरणे आहेत. काही माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या अनुसार या योजनेच्या पैशाच्या भरवशावर कित्येक महिलांनी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे कारण त्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळण्याची हमी प्राप्त झालेली आहे.
बालिका आणि विद्यार्थिनीसाठीही योजना
फक्त महिला हा घटकच महायुती सरकारने केंद्रस्थानी ठेवला आहे असे नाही तर बालिका आणि विद्यार्थिनी यांच्या कल्याणाकडेही महायुती सरकारचे विशेष लक्ष आहे. लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत मुलींना आर्थिक मदत देण्यात येते या अंतर्गत मुलीला विविध टप्प्यात पैसे देण्यात येतात. मुलीच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये जमा करण्यात येतात तर दुसरा हप्ता तीन ते सहा वर्षाच्या दरम्यान सहा हजार रुपयांचा देण्यात येतो आणि सात हजार रुपयांच्या तिसरा हप्ता मुलगी 14 वर्षाची झाल्यानंतर देण्यात येतो. मुलींच्या औषध उपचाराचा आणि लसीकरणाचा खर्च देण्यात यावा यासाठी पहिला हप्ता देण्यात येतो.. दुसरा आणि तिसरा हप्ता मुलीच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी देण्यात येत आहे. नंतरचे आठ हजार रुपये मुलीच्या अकरावी प्रवेशाच्या वेळी मिळतात आणि मुलगी सज्ञान होते तेव्हा 75 हजार रुपये पुढील शिक्षणासाठी देण्यात येतात.
अर्ध्या दरात बस प्रवास आणि अन्य योजना
महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत महिलांना बस प्रवासात 50 टक्क्यांची सवलत देण्यात आलेली आहे. लग्न, स्वयंसहाय्यता बचत गटात सहभागी होण्यासाठी मदत, स्टार्टअप सुरू करण्यासाठी लखपती दीदी अंतर्गत मदत, एकल महिलेसाठी मदत आणि प्रसूती दरम्यान मदत देखील महिलांना देण्यात येते. 65 वर्षावरील महिलांसाठी दीड हजार रुपये प्रतिमाह आणि तीन हजार रुपये दरवर्षी राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. महिलांच्या स्वावलंबनासाठी त्यांना ऑटो रिक्षा देण्याची योजनाही सरकारने राबवली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील महिलांना वर्षभरात तीन मोफत सिलेंडर देण्यात येत आहेत.
मुलींना मोफत उच्च शिक्षण
मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देण्याची योजना राज्य सरकारने अर्थसंकल्पात घोषित केली. विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. साडेसात लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त करण्याची क्षमता मुलींमध्ये प्राप्त होणार आहे आणि साडेसात लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणाऱ्या गटातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी राज्य सरकारने घेतली आहे.
लाडक्या बहिणी ठरणार महायुतीच्या तारणहार ?
महिलांसाठी राबवलेल्या विविध योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय झाल्या असून. कोट्यवधी महिलांनी या योजनांचा लाभ घेतलेला आहे. थेट खात्यात पैसे जमा होत असल्यामुळे कमिशन आणि एजंट गिरीला कोणताही वाव राहिलेला नाही. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे महायुती सरकारची विश्वासार्हता महिला वर्गात विशेषत्वाने वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच महायुतीच्या तारणहार ठरतील अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.












Click it and Unblock the Notifications