महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्का? शरद पवार गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार करत आहेत. विशेषतः भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील हालचालींमध्ये महाविकास आघाडीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे.

नाशिकमध्ये शरद पवारांच्या गटाला झटका?
नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. गणेश गीते हे यापूर्वी भाजपमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली होती. आता ते पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, गणेश गीतेंच्या सोबत काही माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गीते हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जातात. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्याविरोधात लढत दिली होती. पुढील दोन दिवसांत गीते आणि त्यांच्या समर्थकांचा औपचारिक भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसलाही मोठा फटका
फक्त राष्ट्रवादी नव्हे, तर काँग्रेसलाही या राजकीय उलथापालथीमुळे मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावर असलेले कुणाल पाटील हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. अनेक दशकांपासून काँग्रेसशी निष्ठा राखलेलं त्यांचं कुटुंब आता भाजपकडे वळणार आहे.
धुळे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना झाले असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य - जसे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीतील सरपंच-उपसरपंच, बाजार समित्यांचे अध्यक्ष व संचालक यांचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात ढासळण्याची शक्यता आहे.
या राजकीय हालचाली महाविकास आघाडीतील फुटीचे संकेत देत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरू झालेली ही गळती थांबेल की आणखी नेते दुसऱ्या पक्षात सामील होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications