प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई; 10 आर.एम.सी. प्लँट बंद, 84लाखांचा दंड वसूल!
Maharashtra Pollution Control Board action : मुंबई आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असताना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) आता कंबर कसली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली, प्रदूषणकारी प्रकल्पांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत मंडळाच्या भरारी पथकांनी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) ४४ आर. एम. सी. (Ready Mix Concrete) प्लँटची तपासणी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० प्लँटवर थेट टाळे ठोकले आहे.

एमपीसीबीची धडक कारवाई: प्रमुख 10 प्लँट बंद!
पर्यावरण नियमांचे पालन न केल्यामुळे मंडळाचे सदस्य सचिव श्री. एम. देवेंदर सिंह (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली खालील १० आर. एम. सी. प्लँट तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत:
१. स्वामीनारायण लाईफस्पेस एल. एल. पी., डोंबिवली २. मे. जे. आर. बी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., कल्याण ३. श्रीराम इंटरप्रायजेस, टेंबघर अंबरनाथ ४. प्रिझम जॉनसन लि., भिवंडी ५. एल. ॲण्ड टी., भिवंडी ६. कृष्णा कन्सट्रक्शन्स्, दहीसर मोरी ७. प्रकाश इंजिनिअर्स ॲण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस्, तुर्भे ८. ए. पी. कन्सट्रक्शन्स्, तुर्भे ९. गजानन साईदत्त ॲसोसिएटस्, विरार १०. आर. डी. एस. प्रोजेक्ट, वरळी. याव्यतिरिक्त, १७ प्लँटला प्रस्तावित निर्देश तर ४ प्लँटना अंतरिम निर्देश देऊन सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
८४ लाखांचा दंड आणि बँक हमी जप्त!
या मोहिमेअंतर्गत केवळ प्लँट बंदच केले नाहीत, तर पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आस्थापनांच्या खिशालाही कात्री लावली आहे. कल्याणमधील ९, नवी मुंबईतील १ आणि रायगडमधील ७ अशा एकूण १७ प्लँटकडून मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल ८४ लाख रुपयांचा दंड बँक हमी अंतर्गत वसूल करण्यात आला आहे.
बांधकाम प्रकल्पांचीही झाडाझडती!
हवेतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी भरारी पथकांनी २९ मोठ्या बांधकाम प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यापैकी नियमांचे पालन न करणाऱ्या ५ बांधकाम प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस (प्रस्तावित निर्देश) बजावण्यात आली आहे.
आतापर्यंत ४ कोटींहून अधिक दंड वसूल
डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेने आता रौद्र रूप धारण केले आहे. एमपीसीबीच्या आकडेवारीनुसार: एकूण तपासणी केलेले प्लँट: २४०, एकूण वसूल केलेला दंड: ४ कोटी ३५ लाख रुपये इतका आहे.
"मुंबई आणि परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारणे ही आमची प्राथमिकता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भरारी पथक दररोज या कामाचा आढावा घेत असून, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एकाही प्रकल्पाची गय केली जाणार नाही, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव तथा (IAS) श्री. एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications