नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा 'विराट' विजय! महाराष्ट्रात BJPच 'नंबर-1'; फडणवीस काय-काय म्हणाले?
Devendra Fadnavis on Maharashtra Nagar Panchayat result 2025 : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा पुरता सफाया करत निर्भेळ यश संपादन केले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाने ११७ हून अधिक नगराध्यक्षपदे जिंकून आपणच राज्याचा 'नंबर १' पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

आकड्यांमधून भाजपची 'सुनामी'
निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. एकूण नगराध्यक्ष पदांपैकी २१३ जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवर समाधान मानावे लागले.
नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक 2025 : भाजपा पुन्हा नंबर 1 ! 🪷
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 21, 2025
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार… pic.twitter.com/b7z4Aa6imG
भाजपचा नवा विक्रम
२०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १६०२ नगरसेवक होते, आता ही संख्या दुप्पट होऊन ३३०२ वर पोहोचली आहे. एकट्या भाजपने १२९ नगराध्यक्षांवर मोहोर उमटवली आहे (युतीतील ७५% वाटा).
हे ही वाचा : राज्यातील सर्व नगर पंचायत व नगर परिषदेचे विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा
"लोकांनी आमच्या ब्ल्यु प्रिंटवर विश्वास ठेवला"
विजयाचे श्रेय विकासाच्या मुद्द्यांना देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी पूर्णपणे सकारात्मक प्रचार केला. जनतेसमोर आम्ही विकासाची 'ब्ल्यु प्रिंट' मांडली होती. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि राज्य सरकारने केलेली विकासकामे, याचीच ही पोचपावती आहे. आम्ही लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."
विरोधकांना सडेतोड उत्तर
महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता विरोधक म्हणतील की आम्ही या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. "विरोधकांना स्वतःचा पराभव स्पष्ट दिसत होता.
मात्र, भाजप आणि महायुतीसाठी प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते, कारण जे कार्यकर्ते विधानसभा किंवा लोकसभेत कष्ट करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे," असा टोला त्यांनी लगावला.
हे ही वाचा : नगर परिषद निवडणुकांचा महानिकाल! वाचा प्रत्येक अपडेट
बावनकुळेंचे कौतुक आणि मुनगंटीवारांची साथ
नागपूर जिल्ह्यातील विजयाचे विशेष श्रेय त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. कामठीमध्ये पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून येणे, हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, चंद्रपूरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या काही मुद्द्यांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "पक्षाची दारे सर्वांसाठी उघडी असली पाहिजेत. चंद्रपूरमधील पराभवाची कारणमीमांसा आम्ही करू आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत सुधीर भाऊंना पूर्ण ताकद दिली जाईल."
आगामी महापालिका निवडणुकांसाठी 'हुंकार'
नगरपालिका निवडणुकीतील यशाने महायुतीचे मनोबल उंचावले आहे. "नगरपालिकेपेक्षाही मोठे यश आम्हाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत मिळेल," असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच, ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले नाहीत, तिथेही भेदभाव न करता विकासनिधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
निकालाचे थोडक्यात सार
- भाजप : 129 नगराध्यक्ष, 3302 नगरसेवक (राज्यातील नंबर १ पक्ष).
- महायुती: एकूण 213 नगराध्यक्ष.
- महाविकास आघाडी: 50 नगराध्यक्ष (मोठी पिछेहाट).
२०१४ पासून सातत्याने निवडणुका जिंकणाऱ्या भाजपने या विजयाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली भक्कम पायाभरणी केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली कमळाची व्याप्ती आता विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications