भोकरमध्ये श्रीजया चव्हाण यांची बाजी!तिरुपती कदम कोंडेकरांचा पराभव, अशोक चव्हाण यांची मोठी भुमिका
Maharashtra Election Result 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनी काँग्रेसचे तिरुपती कदम कोंडेकर यांचा पराभव केला.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून अशोक चव्हाण या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र असून विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी जबाबदारीची पदे भूषविली. 2008 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्री पद गेले आणि त्या पदाच्या शर्यतीत तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना मागे टाकून अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री बनले.

2009 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या आणि त्यात काँग्रेसने यश मिळवले. 2009 साली पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची माळ पडली. पण आदर्श घोटाळ्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले.
त्यानंतर अशोक चव्हाण काही वर्षे राजकीय दृष्ट्या पिछाडीवर गेले मात्र नांदेड जिल्ह्यात त्यांचे राजकीय अस्तित्व कायम होते. 2019 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 43 जागा जिंकल्या. निवडणुकीत महायुतीचा विजय झालेला असला तरी आयत्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि मुख्यमंत्रीपद मिळविले.
उद्धव यांच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री पद देण्यात आले. हे जबाबदारी अशोक चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. पण 2022 साली राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आणि एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत बंड केले. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. वर्षभरानंतर अजित पवार देखील युती सरकारमध्ये सहभागी झाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडी घडत असताना अशोक चव्हाण काहीसे अलिप्त होते. आणि काही कालावधीतच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. आपल्या पारंपरिक भोकर मतदारसंघातून ते कन्या श्री जया चव्हाण यांच्यासाठी इच्छुक होते.
भाजपनेही भोकर मतदारसंघातून श्री जया यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने तिरुपती कदम कोंडेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भोकर ची जागा जिंकून घेणे अशोक चव्हाण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे होते. नांदेडच्या चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करत असल्यामुळे या जागेवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.












Click it and Unblock the Notifications