Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यातच शरद पवारांना दणका; पदरात अवघी एक जागा

Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार यांनी आपल्या चाळीस आमदारांसह युती सरकार मध्ये प्रवेश केल्यापासून राज्यात शरद पवार आणि अजित पवार हा चुलत्या पुतण्यांचा संघर्ष टिपेला गेला आहे. पण पवारांची दादागिरी असलेल्या पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना जबरदस्त दणका बसला असून 21 पैकी अवघी एक जागा जिंकण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यश आले आहे. पवारांना हा सर्वात मोठा धक्का आहे.

अजित दादा बरोबर गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जंगी सभा घेऊन शरद पवारांनी त्यांना आव्हान दिले होते. अजित पवार यांनीही हे आव्हान स्वीकारून मुकाबला केला. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून तर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करून राजकीय संघर्ष कौटुंबिक संघर्ष करून टाकला. त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. शेजारच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांना आसमान दाखवले.

Sharad Pawar

लढवलेल्या लोकसभेच्या 10 पैकी आठ जागा जिंकून आपणच वस्ताद आहोत, हे शरद पवारांनी सिद्ध केले. पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वाढलेल्या राजकीय वजनामुळे शरद पवारांकडे नेत्यांचा चौफेर ओघ सुरू झाला. अगदी अजित पवार यांच्याबरोबर गेलेले नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आपला गाशा गुंडाळून शरद पवार यांच्या गटात दाखल होऊ लागले.

पण विधानसभा निवडणुकीत सगळे वारे फिरले. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे करून शरद पवार यांनी चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवार यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने युगेंद्र पवार यांना पराभूत करून साक्षात शरद पवारांचे आव्हान मोडून काढले. पुणे जिल्ह्यातील 21 जागांपैकी वडगाव शेरीची अवघी एक जागा जिंकून शरद पवार यांनी आपले अस्तित्व कसेबसे राखले.

पुणे जिल्ह्यातील 21 जागांपैकी शरद पवार गटाने तब्बल 12 जागा लढवल्या. त्यापैकी एक जागा शरद पवार गटाने जिंकली. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सात ठिकाणी सामना झाला. यापैकी सहा ठिकाणी अजित पवार यांच्या उमेदवारांनी शरद पवार यांच्या उमेदवारांना चित्तपट करून टाकले.शरद पवार यांनी प्रचार केलेले काँग्रेसचे उमेदवार देखील सपाटून पराभूत झाले. जिल्ह्यात भाजपने नऊ जागा जिंकून दणका दिला. त्या पाठोपाठ अजित पवार गटाने आठ जागा जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळाली. जुन्नर मधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. खेड आळंदीची एक जागा मात्र उद्धव ठाकरे गटाला मिळाली. अशा रीतीने अवघ्या सहा महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बलाढ्य असलेला शरद पवार गट पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचा पडता काळ पाहून त्या गटातून शरद पवारांच्या गटाकडे गेलेल्या स्थानिक नेत्यांचे आता भविष्यात काय होणार हा प्रश्न पुणे जिल्ह्यात चर्चेत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+