Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संजय निरुपम अनेक वर्षांनी रिंगणात, दिंडोशीतून देणार उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तियाशी लढत

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेच्या स्थापनेच्या काळापासून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेनेचे संघटन यांना माध्यमांचे पाठबळ कधीही लाभलेले नाही. शिवसेनेच्या विचारधारेवर आणि कार्यपद्धतीवर तत्कालीन मराठी माध्यमांनी नेहमीच कोरडे ओढले. हिंदी आणि इंग्रजी माध्यमही बाळासाहेबांच्या विरोधात होती. आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीला मार्मिक नावाचे नियतकालिक सुरू केले.

संघटनेचा जसजसा विस्तार होत गेला आणि राजकीय यश मिळत गेले तस तसे शिवसेनेचे विरोधकही वाढत गेले. राज्य पातळीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना नावाचे दैनिक सुरू केले. हळूहळू सामन्याची हिंदी आवृत्ती देखील काढण्यात आली.."दोपहर का सामना" या नावाने सुरू झालेल्या या दैनिकाचे संपादक होते संजय निरुपम. बिहार येथून आलेल्या अवघ्या तिशीतल्या तरुणावर बाळासाहेब ठाकरे यांनी संपादक पदाची जबाबदारी दिली. अल्पावधीतच बाळासाहेबांचा विश्वास संजय निरुपम यांनी जिंकून घेतला आणि तरुण वयातच बाळासाहेबांनी निरुपम यांना राज्यसभेवर पाठवले.

Sanjay Nirupam

बाळासाहेबांशी मतभेद

राज्यसभेचे सभागृह संजय निरुपम यांनी आपले कामगिरीने दणाणून सोडले. पण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले आणि संजय निरुपम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे संजय निरुपम काँग्रेसमध्ये सहभागी झाले. काँग्रेसकडूनही त्यांनी आपला कार्यकाळ गाजवला. 2009 साली उत्तर मुंबई सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात गोपाळ शेट्टी यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव करून निरूपम लोकसभेत पोहोचले. 2014 साली त्यांचा पराभव झाला आणि त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर विशेष लक्ष ठेवले. शिवसेना आणि भाजप अशा दोघांवरही आसूड ओढण्यात आणि काँग्रेसची भूमिका ठामपणे पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 2017 साली झालेल्या महानगरपालिकेची निवडणुकीत काँग्रेसची दाणादाण उडाली आणि निरूपम यांचे महत्त्व मुंबई काँग्रेसमध्ये कमी कमी होत गेले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

2022 साली राज्यात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत भूकंप झाला. एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीला पोहोचले. सर्वांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आसन स्थिर देखील झाले.या सगळ्या काळात संजय निरुपम यांनी शांत राहणेच पसंत केले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, आणि काँग्रेस यांनी आपापले उमेदवार जाहीर केले.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. अमोल कीर्तीकर यांचे नाव खिचडी घोटाळ्यात गाजले होते. "गरिबांची खिचडी खाणाऱ्या अशा भ्रष्टाचारी उमेदवाराचा प्रचार करणार नाही" असे ठणकावून सांगत संजय निरुपम यांनी आपली भूमिका मांडली. ही भूमिका महाविकास आघाडीच्या विरोधातील भूमिका असल्यामुळे काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. पण "पक्ष कार्यालयाचा स्टेशनरीचा खर्च कशाला वाढवता, मीच राजीनामा देतो" असे म्हणत त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आणि काही कालावधीतच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.

कॉंग्रेसचा घेतला समाचार

शिवसेनेत दाखल झाल्यापासून संजय निरुपम यांनी पक्षाची भूमिका थेट आणि अभ्यासू पणे मांडण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः हिंदी भाषिक माध्यमात त्यांना विशेष स्थान देण्यात येते. आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतानाच संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस तसेच शरद पवार गट यांनाही लक्ष्य केले आहे. राम मंदिर पुनर्बांधणी आणि राम लल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या प्रसंगी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर संजय निरुपम यांनी कठोर भाषेत कोरडे ओढले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

दिंडोशीतून संधी

2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी संजय निरुपम यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट दिले आहे. दिंडोशी या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सुनील प्रभू हे आमदार आहेत. मात्र या परिसरात उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याशिवाय भाजपनेही येथे आपली ताकद जबरदस्त वाढवलेली आहे. उत्तर भारतीय मतदार, धनुष्यबाणाला मतदान करणारा मतदार आणि भाजपची ताकद यांचा जोरावर संजय निरुपम आणि सुनील प्रभू असा सामना होणार आहे.

पारडे किंचित जड

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबई केंद्रबिंदू धरून अनेक विकास कामे शहर आणि उपनगरात राबवलेली आहेत.शहरांचे सौंदर्यीकरण, चौकांचे सुशोभीकरण,रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा अनेक योजना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकारने राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ दिंडोशी विधानसभा मतदारसंघालाही झालेला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील तळागाळात झिरपलेली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना पराभूत करायचेच असा ठाम निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे. संजय निरुपम यापूर्वी या परिसरातून कार्यरतही होते. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा व्यक्तिगत संपर्कही चांगला आहे. मतदार संघातील ही सगळी गणिते लक्षात घेता निरूपण यांचे पारडे किंचित जड दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+