मुस्लिमबहुल मुंबादेवीत धनुष्यबाण चालणार, शायना एनसींचं पारडं सध्यातरी जडच
Maharashtra Assembly Election 2024 : सुमारे अडीच लाख मतदार असलेल्या मुंबादेवी मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून शायना एनसी व महाविकास आघाडीत काँग्रेसकडून विद्यमान आ. अमिन पटेल यांच्यात यावेळी सामना रंगणार आहे. हा मतदारसंघ पूर्वी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र त्याच्या पुनर्रचनेनंतर तो काँग्रेसकडे आला. अमिन पटेल हे 2009 पासून या विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असल्याने यावेळी तेथील मतदार हा बदलाच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
भाजप-शिवसेनेतील एकोप्याचा फायदा
या मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शायना एनसी यांचा या मतदारसंघात चांगला होल्ड आहे. शिवाय सामाजिक कार्यात त्या कायम अग्रेसर राहिल्याने त्यांना मतदारसंघाची चांगली ओळख आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला शिवसेनेने तिकीट दिल्यामुळे या मतदारसंघात महायुतीत कमालीचा एकोपा दिसत आहे. सध्या शायना एनसी यांच्या प्रचारात भाजपसह, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गटही चांगलाच सक्रीय झालेला पहायला मिळत आहे.

विद्यमान आमदारांबाबत नाराजी
विद्यमान आ. अमिन पटेल हे 2009 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र तरीही या मतदारसंघात मुलभूत प्रश्न सुटले नसल्याचा आरोप विरोधकांकडून सुरु आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, दाटीवाटीने वसलेली घरे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा हे या मतदारसंघातील सध्याचे चित्र आहे. शंभर, सव्वाशे वर्षे जुन्या छोट्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत.
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रश्न रखडले आहेत. अनेक भागांत बेकायदा धंद्यांमुळे फूटपाथ व्यापले असून, या ठिकाणी चालणेही कठीण झाले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जोडण्या जीर्ण आहेत. पाणीचोरीची मोठी समस्या आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार अनेकदा रहिवासी करतात. त्यामुळे यंदा येथे परिवर्तन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शायना एनसी यांची प्रचारात आघाडी
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी सध्यातरी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शायना या भागातील मतदारांसाठी परिचयातील चेहरा असून त्या मुंबईचे माजी महापौर आणि शेरीफ राहिलेल्या नाना चुडासामा यांच्या कन्या आहेत. फॅशन डिझायनर असलेल्या शायना अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी डोंगरी, उमरखाडी, कुंभारवाडा, भुलेश्वर, खेतवाडी यांसारख्या मराठी, गुजराती मतदार असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपची साथ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतात असाही काहींचा अंदाज आहे.
भाजपचा सलग चार वेळा झेंडा
या मतदारसंघातून भाजपचे राज पुरोहित 2004 पर्यंत सलग चार वेळा निवडून आले होते. मात्र मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर येथे मुस्लिमबहुल लोकसंख्या वाढली आणि काँग्रेसने येथे यश मिळवले. मुंबादेवी मतदारसंघात भेंडी बाजार, नळ बाजार, चोर बाजार, मोहम्मद अली मार्ग, नाखुदा मोहल्ला, डोंगरी, नागपाड्याचा काही भाग या ठिकाणी मुस्लिम लोकवस्ती मोठ्या संख्येने आहे. त्याखालोखाल गुजराती, मारवाडी, जैन समाजाची लोकसंख्या या मतदारसंघात आहे. सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर, दुसरी, तिसरी सुतार गल्ली या परिसरात गुजराती, जैन समाज राहतो. कुंभारवाडा, खेतवाडी, सुतारगल्ली या भागात मराठी मतदार तुलनेत अधिक आहेत. याच भागावर सध्या भाजप व शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले असून मतांची विभागणी टाळण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तब्बल 10 मुस्लिम उमेदवारांशी टक्कर
मुंबादेवी मतदारसंघात शायना एनसी या शिवसेना शिंदे गटाच्या तिकीटावर उभ्या आहेत. मात्र तब्बल 65 टक्के मुस्लिम वोटर असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम उमेदवारही बहुसंख्येने उभे राहिले आहेत. अमीन पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), परमेश मुरली कुराकुला (राईट टू रिकॉल पार्टी), मोहम्मद शुऐब बशीर खतीब (आझाद समाज पार्टी (कांशिराम), मोहम्मद जैद मन्सुरी (ऑल इंडिया मजलिस - ए - इन्कलाब - ए - मिल्लत), मोहम्मद नईम शेख (एआयएम पॉलिटिकल पार्टी), हम्माद सय्यद (पीस पार्टी), आमिर इक्बाल नतिक (अपक्ष), नाझीर हमीद खान (अपक्ष), मोहम्मद रझा इस्माईल मोतीवाला (अपक्ष), उमा परवीन बाबू जरीवाला (अपक्ष) हे बहुतांश मुस्लिम उमेदवार असल्याने त्यांच्या मतविभागणीचा फायदा शायना एनसी यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications