Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गुहागरात भास्कर जाधव यांना शिवसेनेच्या राजेश बेंडल यांचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना या पक्षाला मुंबई आणि ठाण्यापासून सर्वाधिक यश मिळाले ते तळ कोकणात. कोकणातून नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांनी गणपती आणि होळी या उत्सवांच्या दरम्यान शिवसेना आपापल्या गावात नेली. कोकण आणि मुंबई यांचा घट्ट संपर्क असल्यामुळे आणि बहुसंख्य शिवसैनिक हे कोकणातील असल्यामुळे शिवसेना कोकणातही बहरली.

देवगड, रत्नागिरी आणि गुहागर वगळता अन्य बहुतांश मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात असलेले रत्नागिरी आणि गुहागर या दोन्ही मतदारसंघावर अनेक वर्षे भाजपचे आमदार निवडून येत होते. आता रत्नागिरी आणि गुहागर या मतदारसंघावर असलेले भाजपचे वर्चस्व मोडीत निघाले असले तरी भाजपचे अस्तित्व मात्र कायम आहे. हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेचे उदय सामंत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्याकडे अनुक्रमाने आहेत.

Guhagar Assembly Constituency

विधानसभा निवडणूक 2024 साठी महायुतीने आपापसात उमेदवारांची देवाण घेवाण केली आणि अजित पवार गटात असलेले राजेश बेंडल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आणि शिंदे यांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. राजेश बेंडल हे गुहागरच्या स्थानिक राजकारणात मोठे नाव असून त्यांनी गुहागरचे नगराध्यक्ष म्हणून कारभार पाहिलेला आहे. सर्वसामान्य मिळून मिसळून राहणारा कुणबी समाजाचा राजकीय नेता अशी त्यांची ओळख आहे. राजेश बेंडल यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांचे आव्हान उभे ठाकले आहे.

भास्कर जाधव यांना पराभूत करण्याचा चंग

भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे राजकारणात खूपच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.2004 साली शिवसेनेत बंडाचा झेंडा रोवून त्यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. नंतर ते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील झाले. गुहागर मतदारसंघावर 2009 पासून त्यांचे वर्चस्व आहे 2009 आणि 2014 साली त्यांनी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस साठी जिंकून घेतला होता. 2019 साली ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते. 2022 साली झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडात भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भास्कर जाधव यांना गुहागर मतदारसंघात धूळ चारायची असा निश्चयच शिवसेना-भाजप युतीने केला आहे.

पायाभूत सुविधांना गती

या निश्चयाच्या अनुषंगाने गुहागर विधानसभा मतदारसंघात युतीकडून सावध पावले उचलली जात आहेत. विधानसभा मतदारसंघातील पंधरा गावांसाठी जन सुविधा योजनेच्या अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. गुहागर विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या रस्त्यांचा हजारो नागरिकांना लाभ होणार असून जीवनावश्यक सेवा आणि सुविधा यांचे वहन जलद गतीने होणार आहे. गुहागरमधील मार्ग ताम्हाणे हायस्कूलमध्ये 84 मुलींना सुमारे दीड लाखांचा निधी प्रतिवर्षी देण्यात येत आहे.

सौर उर्जा प्रकल्प

वरवेली हे गुहागर मधील एक महत्त्वाचे ठिकाण असून तेथे एक मेगावेट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या हा प्रकल्प 19 लाख युनिट विजेचे उत्पादन प्रतिवर्षीप्रमाणे करीत आहे. ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून पारंपरिक ऊर्जेवरचे अवलंबित्व कमी होणार आहे आणि शाश्वत विकासासाठी या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. चोरवणे या गावात पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून खेड तालुक्यातील आठ विभाग यामुळे जोडले गेले आहेत. हा पूल पुरामुळे नुकसानग्रस्त झाला होता.

लाडकी बहीण योजनेचा 24 हजार महिलांना लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना असून महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात तब्बल 24000 महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांना प्रतिमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेचे तीन हप्ते लाभार्थी महिलांना अदा करण्यात आले असून, त्यामुळे महिलांना हक्काचा आधार मिळाला आहे.

जातीय समीकरणे बेंडल यांच्या बाजूने

शिवसेनेतील फाटाफुटीनंतर भास्कर जाधव हे राज्यव्यापी दौऱ्यात व्यस्त राहिले. त्यामुळे त्यांचे मतदारसंघाकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेण्याची तयारी केली आहे. पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून बेंडल यांच्या मागे संपूर्ण ताकद लावली आहे. येथील जातीय समीकरणे महायुतीच्या बाजूने आहेत. विविध विकासात्मक योजनांच्या पाठबळावर, उद्धव ठाकरे यांचा ह्या मतदारसंघ एकनाथ शिंदे खेचून घेतील अशी चर्चा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात सुरू आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+