लाडक्या बहिणींना खुशखबर, रक्षाबंधनापूर्वीच जुलै-ऑगस्टचा हप्ता? घोटाळ्यांच्या गर्दीत आशेचा किरण!
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सुमारे २ कोटी लाभार्थी महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याचा हप्ता रखडल्याने चिंता वाढली असतानाच, आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रक्षाबंधनला मिळणार दुहेरी भेट?
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जुलै महिना संपून ऑगस्ट उजाडणार असला तरी, अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार रक्षाबंधनाच्या आधीच महिलांना एक खास भेट देण्याच्या तयारीत आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता आहे.
पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास, रक्षाबंधनाच्या सणासाठी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचा सण अधिक आनंदात साजरा होईल. या योजनेतील मासिक अनुदान हे महिलांसाठी एक प्रकारे मासिक वेतनच असल्याने, ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत देण्याचे नियोजन असल्याचे एका अधिकाऱ्याने यापूर्वीच नमूद केले होते. त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळाल्यास, ही राखी पौर्णिमेची खास भेट ठरू शकते.
योजनेतील घोटाळे आणि गैरवापर
एकीकडे महिलांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा असताना, दुसरीकडे या योजनेत झालेल्या गैरव्यवहारांनी मात्र सरकारची चिंता वाढवली आहे. दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत अनेक मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत:
- 'लाडक्या भावांचाही डल्ला': दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी असलेल्या या योजनेचा १४ हजारांहून अधिक पुरुषांनी गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. तब्बल १० महिन्यांपर्यंत १५०० रुपये लाटून त्यांनी २१ कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरवापर केल्याची माहिती लाभार्थींच्या छाननीनंतर समोर आली आहे.
- सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही गैरवापर: धक्कादायक म्हणजे, अनेक सरकारी कर्मचारी महिलांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार (महिला-पुरुष) कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता, २ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी 'लाडकी बहीण योजने'चे पैसे लाटल्याचे स्पष्ट झाले. ६व्या आणि ७व्या वेतन आयोगाचा लाभ घेतल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी पैशांची हाव न सोडल्याने हा प्रकार घडला.
घोटाळेबाजांवर कारवाईचे आदेश
या गैरव्यवहारांची गंभीर दखल घेत राज्य सरकारने कारवाईचे आदेश जारी केले आहेत. लाटलेली लाभाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे भविष्यात अशा गैरवापराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा कधी होते आणि लाखो महिलांना याचा लाभ मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications