कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे यांचीच; वाचा- शिंदेंची राजकीय वाटचाल
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघावरील आपले वर्चस्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग पाचव्या वेळी सिद्ध केले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते केदार दिघे यांचा दारुण पराभव केला आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षा चालक, शिवसैनिक, नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री आणि मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या पश्चात ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचंड विस्तार केला. उत्तम संघटक अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. आनंद दिघे यांच्या पश्चात राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी त्यांचे पुतणे केदार दिघे इच्छुक होते मात्र दिघे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष झाले.
नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळू लागल्यानंतर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. आणि बघता बघता 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. भाजपच्या पाठिंबावर एकनाथ शिंदे हे शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री देखील बनले. शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटापेक्षा चांगला स्ट्राइक रेट राखून एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यांच्या पक्षात नाराजी असली तरी कोणत्याही नेत्याने जाहीरपणे ती व्यक्त केली नाही हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे यश मानले जाते.
2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग चार वेळा एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ जिंकला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पकड ठाणे पालघर जिल्ह्यावर आणखीनच मजबूत झाली. आनंद दिघे यांच्यामुळेच आपण घडल्याचे एकनाथ शिंदे सर्व व्यासपीठावर मान्य करतात. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व मोडून काढण्याचे सर्व ते प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केले. ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रबळ आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे आव्हान सहज मोडीत काढले. कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे आणि मिळवलेला हा सलग पाचवा विजय आहे. आनंद दिघे यांच्या वारशाचा प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांनी या विजयातून सपशेल मोडीत काढला आहे.












Click it and Unblock the Notifications