नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर उत्तर शिवसेनेकडे; महायुतीने कोल्हापुूरातील 10 पैकी 10 जागा जिंकल्या!
Kolhapur Election Result 2024 : अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी आपल्याकडे खेचून आणली. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला राहिला असून जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागा महायुतीने जिंकल्या आहेत. कोल्हापूर उत्तरचा पराभव काँग्रेससाठी धक्कादायक तर राजेश क्षीरसागर यांच्या राजकारणाला नवी उभारी देणारा ठरणार आहे.
कोल्हापूर हा अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा बालेकिल्ला बनला होता. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी या उमेदवारीला विरोध केला आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्या वाड्यावर बैठक घेऊन अन्य उमेदवार देण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार शाहू महाराज यांची सून मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र आयत्यावेळी मधुरिमा राजे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि सतेज पाटील संतप्त झाले.. आयत्यावेळी उमेदवारी मागे घ्यायची होती तर मला तोंडघशी का पाडलं, असा सवाल सतेज पाटील यांनी केला. मधुरिमा राजे यांच्या माघारीमुळे राजेश लाटकर हे महाविकास आघाडी कडून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात राहिले.
दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनी दोन वेळा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2019 साली ते काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभूत झाले. जाधव यांचे निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यादेखील विजयी झाल्या. मात्र त्यांनीही अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात राजेश क्षीरसागर यांनी शिंदे यांना साथ दिली होती. आणि युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची माघार, अपक्ष उमेदवार रिंगणात आणि माजी आमदार महायुतीत गेलेला, अशी विचित्र परिस्थिती उद्भवल्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगतदार झाली होती.
मात्र या लढतील राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्रच महायुतीचा बोलबाला राहिल्याचे दिसून आले. कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ निवडून आले तर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनस्वराज्यशक्तीचे विनायक कोरे आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अशोक माने यांनी विजय मिळवला.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील विजयी झाले. जिल्ह्यातील दहापैकी दहा जागावर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. कोल्हापूर मध्ये काँग्रेसचा खासदार असतानाही जिल्हाभरात झालेली महाविकास आघाडीची ही वाताहत सतेज पाटील यांच्या चिंता वाढवणारी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण राज्याच्या सत्तेप्रमाणे बदलत असते. त्यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये देखील सतेज पाटील यांचा कस लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications