6 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीकडे पूर्ण झुकलेला कोल्हापूर जिल्हा आता 100% महायुतीचा! वाचा विश्लेषण
Kolhapur Election Result 2024 Marathi analysis : लोकसभा निवडणुका नंतर अवघ्या सहा महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाने 360 अंशात कुस बदलली असून सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीकडे पूर्णपणे झुकलेला हा जिल्हा आता 100% महायुतीचा झाला आहे. जिल्ह्यातील दहा पैकी दहा विधानसभा मतदारसंघ महायुतीने जिंकले आहेत. महाविकास आघाडी साठी हा सर्वात मोठा धक्का आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे शाहू महाराज विजय झाले होते. त्यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य मिळाले होते. कोल्हापूरला लागून असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने जिंकले असले तरी महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांनी त्यांना चांगलाच घाम फोडला होता.

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काय होणार? असा प्रश्न तेव्हा कुत्सितपणे विचारला जात होता. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे समरजीत घाटगे यांच्यासारख्या तरुण भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे महायुतीसमोर बिकट आव्हान होते.
मात्र विधानसभा निवडणुकीत सगळे चित्रच पालटून गेले. महायुतीने विलक्षण समन्वय दाखवून सर्वच दहा विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या सतेज पाटील यांना शहरातील दोन्ही मतदार संघ जिंकता आले नाहीत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेला सावळा गोंधळ मिस्तरताना त्यांच्या नाकी नऊ आले. हक्काच्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात देखील त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील पराभूत झाले.
करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके, राधानगरीतून प्रकाश आंबेडकर, कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर, कागल मधून अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, शाहूवाडी मधून जनस्वराज्याचे विनय कोरे, हातकणंगले मधून अशोक माने,, चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजप समर्थित अपक्ष शिवाजी पाटील, शिरोळ मधून युतीचे मित्र अपक्ष राजेंद्र यड्रावकर, इचलकरंजीतून भाजपचे राहुल आवाडे आणि कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला एक जागा सुद्धा जिंकता आली नाही. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. भविष्यात कोल्हापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीची सर्वाधिक भिस्त सतेज पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या एकूण फक्त 49 जागा निवडून आल्यामुळे विधान परिषदेवर निवडून जातानाही सतेज पाटील यांची कसरत होणार आहे.












Click it and Unblock the Notifications