तर राजीनामा देतो, पत्रकार परिषद घेत कोकाटे संतापले; रमीवर काय दिलं स्पष्टीकरण?

विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल (Manikrao Kokate On Playing Rummy Video) झाल्याने वादात सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आज नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोकाटेंनी या चर्चा फोल ठरवत, राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. उलट, त्यांनी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली आणि आपल्यावरील आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

manikrao kokate on resignation

राजीनाम्याऐवजी 'कृषी समृद्धी' योजनेची घोषणा

माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत 'कृषी समृद्धी' या नव्या योजनेचे अनावरण करत असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली होती, मात्र त्याचा जीआर (सरकारी आदेश) निघणे बाकी होते, तो आज निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.

"आरोप बिनबुडाचे, बदनामी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार"

राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलताना कोकाटे म्हणाले, "हा इतका छोटा विषय इतका लांबला का, हे मला कळत नाही. ऑनलाईन रमी खेळण्यासाठी मोबाईल नंबर आणि बँक खाते जोडावे लागते. माझा कोणताही मोबाईल नंबर किंवा बँक खाते ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेले नाही. तुम्ही कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताही येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत."

यामुळे महाराष्ट्रात आपली बदनामी झाल्याचे सांगत, "कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही," असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला.

"मी दोषी आढळल्यास तात्काळ राजीनामा देईन"

सभागृहातील घटनेचे स्पष्टीकरण देताना कोकाटे म्हणाले, "मी त्या दिवशी सभागृहात माझ्या कामासाठी होतो. माझ्या ओएसडीकडून (OSD) माहिती हवी असेल, तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो, कारण त्यांना सभागृहात आत येता येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्यावर तो गेम आला, ज्याचा वारंवार पॉप-अप येतो. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन असल्याने मला गेम स्किप करता आला नाही आणि त्याला वेळ लागला. पण मी गेम स्किप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही."

"माझा व्हिडिओ ११ सेकंदांचा आहे. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. ३० सेकंद गेम स्किप करता येत नाही. पूर्ण व्हिडिओ दाखवला असता, तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते," असे ते म्हणाले.

"मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. माझ्या पत्राच्या आधारे चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन आणि मी दोषी सापडलो, तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावे, त्या क्षणाला न थांबता, त्यांना न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन," असे कोकाटे यांनी ठामपणे सांगितले.

"सीडीआर चौकशी करा, सूत्रधार शोधा"

व्हिडिओ कोणी काढला, याच्या खोलात जायचे नाही, परंतु त्यात इतके विशेष काही नव्हते की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या किंवा छावा संघटनेच्या भावना दुखावतील, असे कोकाटे म्हणाले. "मी काहीही वेडेवाकडे केलेले नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी इतके निर्णय घेतले, त्यासंदर्भात आतापर्यंत कोणीही काहीच बोलले नाही. फक्त ज्याचा शेतकऱ्यांशी संपर्क नाही, अशा गोष्टी फक्त मीडियात दाखवल्या गेल्या." दोषी असलेल्या सर्वांचे सीडीआर (CDR) चेक करावेत आणि या सर्वांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणीही कोकाटे यांनी केली.

"राजीनामा देण्यासारखं घडलं काय?"

"मी राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केला आहे? मी चोरी केलेली आहे का? माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे?, असं झालंय काय?" असे संतप्त प्रश्न विचारत कोकाटे म्हणाले, "फक्त एक फोटो, त्याचा व्हिडिओ विरोधकांनी रेकॉर्ड केलाय. मी त्यांना कोर्टात खेचणार आहे, अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करणार आहे."

"मीडियावाल्यांनी एकदा काही टाकले की, लगेच खाली प्रतिक्रिया येतात. आता माझा पाय तिरपा पडला, तर लगेच मीडिया म्हणेल, कृषीमंत्र्यांचा पाय तिरपा पडला. अरे, पाय तिरपा कशामुळे पडला? मग खाली प्रतिक्रिया येतात की, 'हा दारू प्यायला असेल', 'हा गांजा प्यायला असेल', 'त्या बाजूला बाई दिसत आहे, तिच्याकडे बघत असेल'," असे त्यांनी उपरोधाने म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

नुकतंच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांमुळे चांगलेच गाजले. अधिवेशन संपले असले तरी नेत्यांचे कारनामे काही थांबलेले नाहीत. आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जितेंद्र आव्हाड, भाजपचे पडळकर यांच्यानंतर कृषिमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळत असल्याचा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर राज्यातल्या राजकारणात एक नवा वाद सुरू झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+