मंत्रीपद गेलं, आता 6 महिन्यांत आमदारकीही जाईल, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंबाबत भविष्यवाणी, म्हणाल्या
परळी न्यायालयात आज करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी झाली. ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी आता ४ एप्रिलला होणार आहे. दरम्यान, आज न्यायालयात आल्या असता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत एक मोठी भविष्यवाणी केली. येत्या सहा महिन्यांत त्यांची आमदारकीही जाईल, असं करुणा मुंडे यांनी पत्रकारांना सांगितलं.

काय म्हणाल्या करुणा मुंडे?
न्यायालयात आल्या असता करुणा मुंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी म्हणाले होते की धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद जाईल. तसेच झाले. आता मी सांगते की, येत्या सहा महिन्यांत त्यांची आमदारकीही जाईल. बघा तसेच होईल. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी २०० बुथ ताब्यात घेतले होते. निवडणुकीच्या शपथपत्रात माझे नाव नव्हते. २०२४ पासून ते माझं व माझ्या मुलांचं नाव टाकत नाहीत. निवडणूक अधिकारी किंवा जिल्हाधिकारीही त्यावर आक्षेप घेत नाहीत. पण आता माझ्या तक्रारीला न्याय मिळेल, असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केला.
आमदारकी जाण्याचा विश्वास
करुणा मुंडे म्हणाल्या, मी त्यांचे मंत्रीपद जाईल असं सांगितलं होतं. आता सांगतेय की येत्या सहा महिन्यांत त्यांची आमदारकीही जाईल. बघा मी काय म्हणते, तसंच होईल. याच प्रकरणावर माझी लढाई सुरू आहे. आता त्याचे वॉरंट निघेल. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. धनंजय मुंडेंना जावं लागेल. धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार हे मी जसं बोलले होते, तसंच सांगते की येत्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावाही करुणा यांनी केला.
कराडचे घरही तोडा
यावेळी करुणा मुंडे यांनी आष्टीचा खोक्या भोसले याच्यावरही भाष्य केले. खोक्या भोसले मला दोनदा भेटला असल्याची कबूली त्यांनी दिली. जर खोक्या भोसलेचे घर पाडले जाते तर मग वाल्मिक कराडचे घर का पाडले जात नाही, असा सवालही करुणा मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. कोणाचेही घर तोडण्याचा, जाळण्याचा अधिकार नाही. तुम्हाला घरं तोडायची आणि जाळायचीच असेल तर मंत्री, आमदारांची तोडा. हे लोक तरुणांना गुंड प्रवृत्तीकडे नेत आहेत, असं सांगतानाच वाल्मिक कराडचे घर का नाही तोडले? असा सवाल त्यांनी केला आहे












Click it and Unblock the Notifications