कन्नडच्या मैदानात पत्नीची पतीवर मात !! शिवसेनेच्या संजना जाधव विजयी
Maharashtra Assembly Election Result 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि त्यांचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढतीमुळे लक्षवेधी ठरलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघात संजना जाधव यांनी आपल्या पतीचा पराभव केला. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कन्नड विधानसभा मतदार संघातील ही लढत पक्षीय चढाओढीपेक्षा पती-पत्नी आणि सासरे यांच्या वादामुळे आणखी रंगतदार झाली होती.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील मतदार संघ आहे. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव हे देखील आमदार होते. प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ओळख आहे. पाणी प्रश्नासाठी त्यांनी प्रचंड मोठे काम केले. त्यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव हे देखील मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला होता.
हर्षवर्धन जाधव यांचा विवाह भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्याशी झाला होता. मात्र हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यात बेबनाव निर्माण झाला. हर्षवर्धन जाधव यांनी त्याचे खापर सासरे रावसाहेब दानवे यांच्या माथ्यावर फोडले.
2024 लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा जालना विधानसभा मतदारसंघात धक्कादायक पराभव झाला. लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापला आसरा शोधला. संजना जाधव या देखील निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक होत्या मात्र कन्नड विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांची थोडीशी अडचण निर्माण झाली होती. रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर संजना जाधव यांचा शिवसेनेत रीतसर प्रवेश झाला. आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.












Click it and Unblock the Notifications